भाजपा-शिवसेना एका नाण्याच्या दोन बाजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 10:18 PM2019-01-14T22:18:03+5:302019-01-14T22:18:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सडक-अर्जुनी : मागील ४ वर्षांपासून विकास कामे खोळंबली असून विकासकामांची सरकारने वाट लावली. शिवसेना आणि भाजपा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : मागील ४ वर्षांपासून विकास कामे खोळंबली असून विकासकामांची सरकारने वाट लावली. शिवसेना आणि भाजपा एकाच नाण्याच्या दोन बाजू असून आपण दोेघे भाऊ-भाऊ सर्वकाही वाटून खावू, अशा म्हणीप्रमाणे सरकार चालत आहे. या सरकारला अधिकारी, बेरोजगार आणि व्यापारी कंटाळले म्हणून अशा सरकारला धडा शिकविण्याची वेळ आली आहे, असे विचार राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले.
काँग्रेस पक्षातर्फे धानाला २५०० रुपये हमीभाव व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी असे मुद्दे घेवून काढण्यात आलेल्या संघर्ष यात्रेच्या येथील दुर्गा चौकात शुक्रवारी (दि.११) आयोजीत जाहीर सभेत ते बोलत होते. सभेला विधानसभेचे विरोधी पक्षनेते डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आ. नशिम खान, माजी. आ. सेवक वाघाये, माजी आ. रामरतन राऊत, आ. गोपालदास अग्रवाल, संघर्ष यात्रेचे संयोजक आशिष दुआ, बबनराव तायवाडे, जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष उषा शहारे, जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, जि.प.सदस्य सरिता कापगते, अर्जुनी-मोरगाव विधानसभा प्रमुख रत्नदीप दहिवले, राजेश नंदागवळी, डॉ. बबन कांबळे, गायत्री इरले, माया चौधरी, मिरा झोडवणे, रियान शेख, निशांत राऊत, शेषराव गिऱ्हेपुंजे, राजू पटले, अनिल राजगिरे प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी विखे पाटील यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात ४ वर्षापासून अभ्यासच करीत असून त्यामध्ये ते फेल झाले आहे. घरघुती गॅस सिलींडरचे भाव वाढले आहे. धानाला भाव नाही. कर्जमाफीसाठी तीन ते चार वेळा निकष बदलले परंतु त्यांना जमू शकले नाही. त्यामुळे या सरकारला धडा शिकवणे आवश्यक असून याकरिता ही जनसंपर्क यात्रा काढण्यात आली असल्याचे सांगीतले. प्रास्ताविक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शेषराव गिऱ्हेपुंजे यांनी मांडले. संचालन राजू पटले यांनी केले. आभार अनिल राजगिरे यांनी मानले.