मुख्य मुद्यांवरून लक्ष भटकविण्याचे भाजपचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 10:24 PM2019-01-14T22:24:11+5:302019-01-14T22:24:35+5:30
राजकारणात धर्माची प्रमुख भूमिका असावी. मात्र धर्माचे राजकारण करणे हे योग्य नाही. आज भाजप सरकार देश व राज्यात धर्माच्या नावावर देशवासीयांना आपसांत वाटून देशाच्या विकासात अडचण निर्माण करीत आहे. धर्माचे राजकारण करून मुख्य मुद्दयांवरून लोकांचे लक्ष भटकाविण्याचे काम भाजप सरकार करीत असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्ष नेते डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांना केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राजकारणात धर्माची प्रमुख भूमिका असावी. मात्र धर्माचे राजकारण करणे हे योग्य नाही. आज भाजप सरकार देश व राज्यात धर्माच्या नावावर देशवासीयांना आपसांत वाटून देशाच्या विकासात अडचण निर्माण करीत आहे. धर्माचे राजकारण करून मुख्य मुद्दयांवरून लोकांचे लक्ष भटकाविण्याचे काम भाजप सरकार करीत असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्ष नेते डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांना केला.
लगतच्या ग्राम नागरा येथे २ कोटींच्या निधीतून होणाऱ्या विकास कामांच्या भूमिपूजनप्रसंगी शुक्रवारी (दि.११) ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार गोपालदास अग्रवाल होते. पुढे बोलताना डॉ. पाटील यांनी, आज देशातील तरूण बेरोजगार आहे, शेतकरी आत्महत्या करीत आहे, व्यापाºयांचे उद्योगधंदे चौपट होत आहेत. असे गंभीर विषय सोडून मात्र भाजप धर्माचे राजकारण करीत आहे. मात्र आता मतदार भाजपच्या घोषणांनी त्रस्त झाले असून मोदींनी दाखविलेला ‘अच्छे दिन’चा मायाजाल तुटल्याचे ५ राज्यांतील निवडणूक निकालांनी स्पष्ट झाले आहे. देशातील भाजप सरकारला आता निरोप देण्याचा निर्धार देशवासीयांनी घेतल्याचे मत व्यक्त केले.
माजी आमदार आशिष देशमुख यांनी, विधानसभेतील सर्वात अनुभवी व्यक्ती आमदार गोपालदास अग्रवाल असून विधानसभेत त्यांच्याकडून पुष्कळ काही शिकण्यास मिळाल्याचे सांगीतले. तर प्रास्तावीकातून जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता वैरागकर यांनी, मिळालेल्या २ कोटींच्या निधीतून बालाघाट रोड-मंदिर रस्ता सिमेंटीकरण व पथदिवे, शिव मंदिर-भैरव मंदिर रस्ता डांबरीकरण, शिव मंदिर व भैरव मंदिर आवारभिंत दुरूस्ती व सौंदर्यीकरण, स्वागत द्वार, तलावाजवळ प्रसाधनगृह व २ कक्ष, सभागृह, मंदिर परिसरात पहिल्या माळ््यावर भक्त निवास, ३ विंधन विहीर व पंप, मंदिर परिसरात गट्टूकरणाचे काम केले जाणार असल्याची माहिती दिली.
संचालन करून आभार कॉँग्रेस कमिटीचे शहर महासचिव अपूर्व अग्रवाल यांनी मानले.
कार्यक्रमाला अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटी सचिव आशिष दुआ, जिल्हा परिषद अध्यक्ष सिमा मडावी, रमेश लिल्हारे, रमेश अंबुले, लता दोनोडे, माधुरी हरिणखेडे, चमन बिसेन, पुष्पा अटराहे, रणजीतसिंह गौर, प्रशांत लिल्हारे, शैलेश गौर, दिलीप लिल्हारे, जय बुडेकर, मुन्ना नागपूरे, योगेश लिल्हारे, अमृतलाल पतेह, दुर्गाप्रसाद धांदे यांच्यासह मोठ्या संख्येत गावकरी उपस्थित होते.
नागराला ‘अ’ वर्गाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न - अग्रवाल
मोठ्या संघर्षानंतर नागराला ‘ब’ वर्ग तिर्थक्षेत्राच दर्जा मिळविता आला. जिल्ह्यातील या प्राचीन तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी सतत प्रयत्न केल्याने आज शिव मंदिर परिसरात बदल दिसून येत आहे. भविष्यात नागराला ‘अ’ वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी सांगीतले. शिव मंदिर पोहचण्यासाठी गावात बायपास मार्गासाठी भूमि अधिग्रहणाचे काम सुरू असून लवकरच बायपास मार्गाच्या बांधकामाला गती दिली जाणार असल्याचे सांगीतले.