गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा कहर व त्यात आता मृत्यूचे तांडव सुरू असतानाच बुधवार (दि.१४) जिल्ह्यासाठी काळा दिवस ठरला आहे. कोरोनामुळे आतापर्यंतची सर्वाधिक २० मृत्यूंची नोंद बुधवारी घेण्यात आली आहे. तर ६६३ बाधितांची भर पडली असून ३१२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यानंतर आता जिल्ह्यातील बाधितांची संख्या २२,८०२ झाली असून यातील १६,८४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ५,६९३ क्रियाशील रुग्ण आहेत. मात्र वाढत्या मृत्यूसंख्येमुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात बुधवारी (दि. १४) नवीन ६६३ बाधितांची भर पडली असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील ३७३, तिरोडा ९३, गोरेगाव ४०, आमगाव ५२, सालेकसा १२, देवरी ५०, सडक-अर्जुनी २२, अर्जुनी - मोरगाव तालुक्यातील १८ तर इतर राज्ये व जिल्ह्यातील ३ रुग्ण आहेत. तर ३१२ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील १७३, तिरोडा २४, गोरेगाव ६, आमगाव २६, सालेकसा ५, देवरी १४, सडक - अर्जुनी २९, अर्जुनी - मोरगाव तालुक्यातील ३२ तर इतर राज्ये व जिल्ह्यातील ३ रुग्ण आहे.
यानंतर आता जिल्ह्यात ५,६९३ क्रियाशील रुग्ण असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील ३४३०, तिरोडा ६१८, गोरेगाव ३४५, आमगाव २८२, सालेकसा १३९, देवरी २०५, सडक - अर्जुनी ४१५, अर्जुनी - मोरगाव तालुक्यातील १९८, तर इतर राज्य व जिल्ह्यातील ६१ रुग्ण आहेत. यातील ४३९३ रुग्ण घरीच अलगीकरणात असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील २९८३, तिरोडा ४०३, गोरेगाव २०९, आमगाव १५३, सालेकसा १०१, देवरी १३६, सडक - अर्जुनी २४८, अर्जुनी - मोरगाव तालुक्यातील ११७ तर इतर राज्ये व जिल्ह्यातील ४३ रुग्णांचा समावेश आहे.
----------------------------
झपाट्याने वाढतोय मृतांचा आकडा
जिल्ह्यात आठवड्याभरापासून कोरोनामुळे रुग्णांचा जीव जात आहे. यात रविवारी (दि. ११) तब्बल १४ रुग्णांचा जीव गेला असतानाच मंगळवारी १२ रुग्णांची भर पडली आहे. तर बुधवारी आतापर्यंतची सर्वाधिक २० मृत्यूंची नोंद घेण्यात आली आहे. यानंतर आता जिल्ह्यातील मृतांची संख्या २६५ एवढी झाली आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील १५८, तिरोडा ३४, गोरेगाव ११, आमगाव १४, सालेकसा ५, देवरी १३, सडक - अर्जुनी ८, अर्जुनी - मोरगाव तालुक्यातील १२ तर इतर राज्ये व जिल्ह्यातील १० रुग्णांचा समावेश आहे.
---------------------------------
१९३१ अहवाल प्रतीक्षेत
जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात तपासणी केली जात आहे. यामुळे बाधितांची आकडेवारीही सातत्याने वाढताना दिसत आहे. यामध्ये तपासण्यांचे अहवालही प्रलंबित राहत आहेत. मात्र, जेवढे जास्त अहवाल प्रलंबित तेवढे जास्त बाधित निघत असल्याचा अनुभव येत आहे. अशात बुधवारी १९३१ अहवाल प्रलंबित असल्याने आता गुरुवारी किती बाधितांची भर पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------------------
२,२७,१०८ कोरोना चाचण्या
जिल्ह्यात आतापर्यंत २२७१०८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये १,१९,०३५ आरटी-पीसीआर असून त्यात १२,४२७ पॉझिटिव्ह तर १,०१,४२२ निगेटिव्ह आल्या आहेत. तसेच १,०८,०७३ तपासण्या रॅपिड ॲन्टिजेन असून यातील ११,२१३ पॉझिटिव्ह तर ९६,८६० निगेटिव्ह आल्या आहेत.