गोंदिया : जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या उद्रेकामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ लागली आहे. त्यातच छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्यातील बाधित रुग्ण गोंदियात दाखल होऊन शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल होत आहेत. यामुळे रुग्णालय हाऊसफुल झाले असून, जिल्ह्यातील रुग्णांना असुविधेचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात आल्याने जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी दोन्ही राज्यांच्या सीमेवर नाकाबंदी सुरू केली आहे. या दोन्ही राज्यांतून येणाऱ्या व्यक्तींची कोरोना चाचणी निगेटिव्ह असेल, तरच प्रवेश दिला जात आहे.
गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. मात्र, त्यानुरूप जिल्ह्यातील आरोग्य संस्थांतील सेवा कमी पडू लागली आहे. जिल्ह्यात खासगी व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये जवळपास ५९० रुग्ण दाखल झाले आहेत. क्षमतेनुरूप आरोग्य संस्थांमध्ये रुग्ण दाखल असल्याने जिल्ह्यातील अत्यवस्थ असलेल्या रुग्णांना रुग्णालयाबाहेरच प्रतीक्षा करावी लागत आहे. परिणामी जिल्ह्यातील अनेक रुग्णांचा मृत्यू होत आहे. ही बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. यामुळे उशिरा का होईना जिल्हा प्रशासनाची झोप उडाली आहे. जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांनी (दि.१७) आदेश निर्गमित करून छत्तीसगड व मध्यप्रदेश या दोन्ही राज्यांच्या सीमांवर येणाऱ्या नागरिकांची कोविड चाचणी करण्याच्या अनुषंगाने नाकाबंदीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, सीमेवर पोलीस बंदोबस्त आणि आरोग्य पथकाच्या माध्यमातून दोन्ही राज्यांतून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांची कोविड चाचणी करण्यात येणार आहे. हे प्रवासी चाचणीत नकारात्मक आढळतील त्यांनाच जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार आहे. उल्लेखनीय असे की, या नाकाबंदीतून जीवनावश्यक वस्तू, माल वाहतूक व रुग्णवाहिका यांना बंधन राहणार नाही.