सिरपूरबांध : लोकमत समूहाने स्वातंत्र संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक-संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेला ‘लोकमत रक्ताचं नातं’ हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. रक्तदान नव्हे तर हा जीवनदानाचा उपक्रम आहे. कोरोनासारख्या संकटकाळात हा उपक्रम राबवून लोकमतने खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य केले आहे. या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाल्याचा मला आनंद होत असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांनी केले.
स्वातंत्रसंग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक-संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून लोकमत, लोकमत सखी मंच, सिरपूरबांध ग्रामपंचायत, सद्भाव कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि.१५) देवरी तालुक्यातील सिरपूरबांध सीमा तपासणी नाका येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ठाणेदार जी. एस. सिंगनजुडे, सरपंच नितेश भेंडारकर, माजी नगरसेवक यादोराव पंचमवार, मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड, वाघमारे, घासे, सखी मंच तालुका संयोजिका सिमरन जांगडे, नक्षल सेलचे पोलीस निरीक्षक एस. एन. भोसले, पोलीसपाटील नरेश शिवणकर, लोकमत इव्हेंटचे श्रीकांत पिल्लेवार उपस्थित होते. शिबिराची सुरुवात स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक-संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी कोरोनामुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असताना लोकमत समूहाने पुढाकार घेत रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले. सर्वांनी आपले सामाजिक दायित्व समजून रक्तदान महान दान करण्याचे आवाहन केले. शिबिरासाठी लोकमत तालुका प्रतिनिधी सुशील जैन, गजानन शिवणकर, तुलाराम कुराडे, नंदूृ शर्मा, सदभाव कंपनीचे कर्मचारी यांनी सहकार्य केले.
.................
५५ रक्तदात्यांनी केले रक्तदान
सिरपूरबांध येथे आयोजित रक्तदान शिबिरात लोकमत सखी मंच सदस्य, पोलीस कर्मचारी, सद्भाव कंपनीचे कर्मचारी, सिरपूर ग्रामपंचायतचे पदाधिकारी आणि नागरिक अशा एकूण ५५ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जाेपासली. तसेच रक्तदानाच्या या महान कार्यात सहभागी होण्याचा संदेश दिला.
................
गोंदिया येथे २७ रक्तदात्यांनी केले रक्तदान
लोकमत आणि जिल्हा युवक काँग्रेस, एनएसयूआय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि.१५) गोंदिया येथील स्थानिक शहीद भोला काँग्रेस भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक-संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या छायाचित्राला मार्ल्यापण करुन शिबिराची सुरुवात करण्यात आली. यावेळी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव विजय सिंग राजू, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. नामदेव किरसान, प्रदेश सचिव अमर वऱ्हाडे, जिल्हा युवक काँग्रेस प्रभारी रुचित दवे, युवक काँग्रेसचे श्रीनिवास नालमवार, अजित सिंह, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आलोक मोहंती, जिल्हा एनएसयूआय अध्यक्ष हरिश तुळस्कर, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष बाबा बागडे, ओम पटले, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र कटरे, रावण चौरासिया, शैलेश बिसेन, रुखनेज शेख, अभिषेक जैन, दलेश नागदवने, कार्तिक येरणे, जाहिद शेख, अमन तिगाला, मंथन नंदेश्वर, वारीस भगत, शुभम निपाने उपस्थित होते. यावेळी २७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.