लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लहान मुलांच्या भांडणाला घेऊन उद्भवलेल्या वादात दोघांनी एका इसमावर गोळी झाडून व कोयत्याने मारून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासंदर्भात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शहरातील दुर्गा चौैक परिसरातील भालाधरे वाईन शॉप जवळ शुक्रवारी (दि.१५) रात्री ८ वाजतादरम्यान घडली. यात शिव दुर्गाप्रसाद यादव (४५, रा. सिंधी कॉलनी बाराखोली सरकारी तलाव जवळ गोंदिया) हे जखमी झाले.प्राप्त माहितीनुसार, जखमी शिव दुर्गाप्रसाद यादव याच्या मुलाचे आरोपी निरज गुरलदास वाधवानी (४७,रा.बाराखोली) याच्या मुलासोबत भांडण झाले होते. यातच २ दिवसांपूर्वी यादवने आरोपीच्या मुलाला थापड मारली होती. याबाबत आरोपीच्या मुलाने आपल्याला मारहाण झाल्याचे वडिलांना सांगितले. माझ्या मुलाला का मारहाण केली म्हणून आरोपी निरज हा शिवला विचारत होता. गुरूवारी (दि.१४) शिव नाव्ह्याच्या दुकानात गेला असता तेथे आरोपी निरज याने त्याला पुन्हा विचारले असता शिवने त्यालाही मारहाण केली. त्याचाच राग मनात धरून वाधवानी व पवन प्रमोद कुमार (२४) या दोघांनी तोंडाला काळे कापड बांधून मोटारसायकलने शुक्रवारी (दि.१५) रात्री दुर्गा चौक गाठले.शिव दररोज पंकज उर्फ गोलू मुरली यादव (२५) या भाच्याच्या दुकानावर रात्री ८ वाजताच्या सुमारास जायचा. शुक्रवारी (दि.१५) रात्री ८ वाजता शिव दुकानावर गेला आणि काही वेळातच दुकानातून दुर्गा चौकातील भालाधरे वाईन शॉप जवळ गेला असतांना आरोपींनी तोंडाला काळा कापड बांधून शिव वर गोळ््या झाडल्या व कोयत्याने मारून तीन ठिकाणी गंभीर जखमा केल्या. यावर शिव आपला जीव वाचविण्यासाठी भवानी यादव यांच्या घरी पळाला.घटनास्थळावरून कोयता व पिस्टल जप्त करण्यात आली आहे. यादवचा प्रथमोपचार येथील वैद्यकीय महाविद्यालयात करून पुढील उपचारासाठी नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे.पंकज मुरली यादव यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी आरोपीविरूद्ध भादंविच्या कलम ३०७, भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अर्ध्या तासातच अटक केली आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनात सदर कारवाई सहायक पोलीस निरीक्षक विवेक नार्वेकर, रामनगरचे ठाणेदार जितेंद्र बोरकर, राजू मिश्रा, वालदे, चकोले, निलेश आडे, स्मीता पडोळे व डीबीच्या पथकाने केली.गोंदियात पिस्टल, बंदुका व देशी कट्यांचा सर्रास वापरगोंदिया शहर हे अत्यंत संवेदनशील शहर होत आहे. क्षुल्लक वाद झाल्यास पिस्टल, बंदुका व देशी कट्टे काढले जातात. त्याचा धाकच दाखविला जात नाही ते त्यातून फायरही केले जात असल्याच्या अनेक घटना शहर व तालुक्यात घडल्या आहेत. परवाना नसतांनाही पिस्टल, बंदुका व देशी कट्टा बाळगणाऱ्यांची चौकशी करण्याची मोहीम पोलीस विभागाने राबविण्याची गरज आहे. याकडे पोलीस अधीक्षकांनी विशेष लक्ष घालणे आवश्यक आहे.
मुलाला मारल्याच्या रागातून गोळी झाडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:13 AM
लहान मुलांच्या भांडणाला घेऊन उद्भवलेल्या वादात दोघांनी एका इसमावर गोळी झाडून व कोयत्याने मारून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासंदर्भात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देदोघांवर गुन्हा दाखल : जखमीला नागपूरला हलविले