गोंदिया : सदोष वीज मीटर लाऊन ग्राहकाला मानसिक व आर्थिक त्रास देऊन तसेच तक्रार दिल्यावर त्याकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचने विद्युत मंडळाच्या दोन अभियंत्यांवर एकतर्फी प्रकरण चालविले. या प्रकरणात न्यायमंचने तक्रारकर्त्या ग्राहकाच्या बाजूने निर्णय सुनावून दोन्ही अभियंत्यांना चांगलाच दणका दिला आहे. निर्णयात न्यायमंचने तक्रारकर्त्याला मानसिक त्रासापोटी तीन हजार रूपये तर खर्चापोटी दोन हजार रूपये देण्याचे आदेश दिला आहे. सविस्तर असे की, तक्रारकर्ता सुजीत भुरणदास बोरकर (रा.माताटोली) यांनी वीज पुरवठा मिळावा यासाठी महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी लिमीटेड कडे १८ फेब्रुवारी २०१२ रोजी अर्ज केला होता. त्यावर वीज मंडळाकडून २४ जुलै रोजी वीज मीटर देण्यात आले व २७ सप्टेंबर रोजी हे मीटर लावण्यात आले. या मीटर मध्ये १४६८० युनिट दाखवित होते व पहिले बिल ४९ युनिटसाठी २६२ रूपये देण्या ऐवजी ७१० व्याजासह सोडून देण्यात आले. या बिल मध्ये दुसऱ्या व्यक्तीचे थकित बिल १८ हजार ६४६.२३ रूपये व त्यावरील व्याज तक्रारकर्त्याला देण्यात आलेल्या मीटरच्या बिलात बेकायदेशीररित्या जोडण्यात आले. विद्युत पुरवठा खंडीत होऊ नये म्हणून तक्रारकर्त्याने ७१० रूपयांचे बिल २३ नोव्हेंबर रोजी भरले. मात्र १ नोव्हेंबर रोजी तक्रारकर्त्याने दोषपूर्ण मीटर बदलून देण्यासाठी विद्युत मंडळाकडे अर्ज व तोंडी विनंतीही केली. मात्र विद्युत मंडळाकडून काहीच कारवाई करण्यात आली नाही उलट दुसऱ्याचे बिल त्यांच्या नावावर पाठविणे सुरूच ठेवले. यावर तक्रारकर्ता बोरकर यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार केली असता मंचाने २२ एप्रिल २०१३ रोजी तक्रार दाखल केली. त्यानुसार ग्राहक मंचकडून विद्युत मंडळाला नोटीस बजावण्यात आले असता त्यांच्याकडून कुणी हजर नाही व लेखी जबाब सुद्धा देण्यात आला नाही. यावर मंचने वीज मंडळाच्या अभियंता ज्योती चहांदे व वैभव गुप्ता यांच्यावर एकतर्फी प्रकरण चालविण्याचे आदेश २५ फेब्रुवारी रोजी काढले. नियमानुसार विद्युत मंडळाने बोरकर यांचा अर्ज प्राप्त होताच मीटरची तपासणी करून त्यात दोष आढळल्यास मीटर प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून त्याप्रमाणे कारवाई करणे गरजेचे होते. मात्र ही कारवाई करण्यात आली नाही. तसेच लावण्यात आलेल्या युनिटच्या दरांबद्दल अहवाल सुद्धा देण्यात आला नाही. हा प्रकार सेवेतील त्रुटी असल्याचे मत न्यायमंच मांडले. त्यानुसार, विद्युत मंडळाच्या दोन्ही अभियंत्यांना तक्रारकर्ता बोरकर यांना त्वरीत दोष रहीत वीज मीटर लावून देणे, मागील सर्व देयके समायोजित करून सुधारीत देयक देणे, मानसिक त्रासापोटी तीन हजार रूपये व खर्चापोटी दोन हजार रूपये बोरकर यांना देण्याचे आदेश ग्राहक मंचने सुनावले. एवढेच नव्हे तर आदेशाची प्रत मिळाल्याच्या ३० दिवसांच्या आत पालन करण्याचेही आदेश दिले आहे. (शहर प्रतिनिधी)
वीज कंपनीच्या अभियंत्यांना ग्राहक मंचचा दणका
By admin | Published: September 14, 2014 12:01 AM