भूमी अभिलेख कार्यालयाच्या कार्यप्रणालीने नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:34 AM2021-09-15T04:34:09+5:302021-09-15T04:34:09+5:30
नवेगावबांध : नियमाप्रमाणे भूमी अभिलेख कार्यालयातील फेरफार प्रकरणाची कामे प्रकरण कार्यालयात दिल्यानंतर २० ते २५ दिवसांत करणे बंधनकारक असते. ...
नवेगावबांध : नियमाप्रमाणे भूमी अभिलेख कार्यालयातील फेरफार प्रकरणाची कामे प्रकरण कार्यालयात दिल्यानंतर २० ते २५ दिवसांत करणे बंधनकारक असते. परंतु अर्जुनी-मोरगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयाकडून नियमाला तिलांजली दिली जात आहे. तीन ते चार महिने लोटूनही येथील फेरफार आणि आखिव पत्रिकेचे कामे होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहे.
मालमत्तेसंबंधी कामे भूमी अभिलेख कार्यालयाकडे असते. पूर्वी फेरफार किंवा आखीव पत्रिकेचे काम हे हस्तलिखीत पद्धतीने करण्यात येत होते. परंतु आता ही काम ऑनलाइन पध्दतीने होतात. ऑनलाइन प्रणाली नव्याने सुरु झाल्यानंतर यामध्ये काही अडचणी येत होत्या. परंतु त्या नंतर ऑनलाइन प्रणालीत सुधारणा करण्यात आली. जेव्हा काम होण्यास सुरुवात झाली तेव्हा येथील कार्यालयातील फेरफारची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली झाली. परिणामी ही कामे ठप्प पडली आहेत. त्यांच्या ठिकाणी जे नवीन कर्मचारी रुजू होणार होते ते ३१ ऑगस्टला कामावर रुजू झाले. १ सप्टेंबरपासून ते १५ दिवसांच्या रजेवर गेले आहे. त्यामुळे नागरिकांची कामे पुन्हा खोळंबली आहेत. यासंदर्भात येथील प्रभारी अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
..............
वरिष्ठ अधिकारी घेणार का दखल?
या समस्येकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक लक्ष देण्याची मागणी नागरिक करीत आहेत. मी तीन महिन्यांपूर्वी आखीव पत्रिकेसाठी भूमी अभिलेख कार्यालय अर्जुनी मोरगाव येथे अर्ज सादर केला होता. ते काम अजूनपर्यंत झालेलेच नाही. प्रभारी अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यास ते समाधानकारक उत्तर देत नाही.
- बुद्धानंद लाडे, अर्जुनी मोरगाव