महाज्योतीच्या व्यवस्थापकीय संचालकांचे ढिसाळ नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:33 AM2021-09-12T04:33:22+5:302021-09-12T04:33:22+5:30
गोंदिया : महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण ही संस्था ओबीसी व भटक्या जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक केंद्रिय व ...
गोंदिया : महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण ही संस्था ओबीसी व भटक्या जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक केंद्रिय व राज्य नागरी परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षेसाठी मदत करण्यासाठी स्थापन झालेली शासकीय संस्था आहे; परंतु आता मात्र मदतीऐवजी, विद्यार्थ्यांना तुच्छ लेखणे, त्यांच्या स्पर्धा परीक्षांसाठी योजनांचा पद्धतशीर बोजवारा उडवणे व विद्यार्थ्यांना विनाकारण मनस्ताप देणे, हा प्रकार महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप डांगे यांनी सुरू केल्याचा आरोप ओबीसी कृती समितीने केला आहे.
यूपीएससी व एमपीएससीसारख्या महत्त्वाच्या परीक्षांच्या बाबतीत महाज्योतीच्या या एमडीने पोरखेळ लावलेला आहे. सुमारे दीड लाख रुपये कोचिंगसाठी प्रत्येक विद्यार्थ्यावर खर्च करण्यासाठी, महाज्योतीने ३१ मार्च २०२१ पर्यंत अर्ज मागितले होते. त्यात १००० यूपीएससीच्या जागेसाठी १६९५ तर एमपीएससीच्या २००० जागेसाठी ७६३२ एवढे अर्ज विद्यार्थ्यांमधून आले. यातून पात्र क्षमतेएवढे विद्यार्थी निवडण्यासाठी नियमाप्रमाणे छाननी परीक्षा घेण्यासाठी, महाज्योतीजवळ एप्रिल महिन्यापासून तर ऑगस्टपर्यंत पाच महिने वेळ होता. जानेवारी महिन्यात विद्यार्थ्यांना कोचिंग देणाऱ्या संस्थांचे टेंडरही मागण्यात आले होते; पण त्यावर कुठलीही कारवाई केली गेली नाही.
संचालक मंडळात वेळोवेळी हा विषय आला; पण अंमलबजावणी शून्य आणि संचालक मंडळाला कुठलीही सूचना न देता, अचानक केवळ ३ दिवसांची अल्प सूचना देऊन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक डांगे यांनी छाननी परीक्षेची तारीख १३ सप्टेंबर जाहीर केली. खरे म्हणजे हा दिवस महाराष्ट्रात सणाचा दिवस असून, आता महालक्ष्मी बसतात. हे जरी सोडले तरी बरेच विद्यार्थी यूपीएससी परीक्षेच्या तयारीठी दिल्ली, मुंबई व अन्य शहरांत गेले आहेत. १० ऑक्टोबर रोजी यूपीएससीची पूर्व परीक्षा होत आहे व त्याची तयारी सुरू आहे. एवढ्या ३ दिवसांच्या अल्पावधीत त्यांना दूरवरून परीक्षा केंद्रावर येणे व परीक्षेचे नियोजन करणे अत्यंत त्रासदायक ठरणार आहे. ओबीसी विद्यार्थ्यांचा महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक डांगे यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे मनस्ताप होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी १३ सप्टेंबरची परीक्षा रद्द करून, ती १० ऑक्टोबरच्या पुढे घ्यावी, अशी मागणी केलेली आहे.
...........................