बोंडगावदेवी : प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना-बाक्टीच्या वतीने आरोग्य उपकेंद्र सिलेझरी येथे कोरोना तपासणी तसेच कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे मिशन राबविण्यात आले. आरोग्य उपकेंद्रात घेण्यात आलेल्या कोरोना चाचणी तसेच प्रतिबंधात्मक लसीकरण उपक्रमादरम्यान सरपंच सुनिता ब्राम्हणकर उपस्थित होत्या.
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुळकर्णी यांनी ग्रामीण जनतेच्या सोयीसाठी विशेष अभियान राबविले. याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थांशी हितगुज साधताना डॉ. कुळकर्णी म्हणाल्या की, सध्या कोरोनाचे संक्रमण गावखेड्यातसुद्धा होत आहे. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी ग्रामस्थांनी कोरोना तपासणी करण्यासाठी बिनधास्त पुढे यावे, मनात शंका ठेवू नका, लक्षणे दिसताच वेळीच तपासणी केल्यास उपचार करणे सोयीस्कर होते. प्रत्येकांनी प्रतिकारशक्ती वाढवावी. कोरोनावर मात करण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. वाढता प्रादुर्भाव थांबविण्यासाठी ग्रामस्थांनी सजग राहून घरामध्ये सुरक्षित राहावे. परिसरात कोरोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी मिशन कोरोना लसीकरण राबविण्यात येत असल्याचे डॉ. श्वेता कुळकर्णी यांनी सांगितले. यावेळी कोरोना चाचणी करून लसीकरण करण्यात आले. यामध्ये आरोग्यसेविका कोडापे, पेंदाम, आशा पर्यवेक्षिका राखडे यांनी सहकार्य केले.