गोंदिया : कोरोनाचा संसर्ग आता जिल्ह्यात पूर्णपणे आटोक्यात आला आहे. सालेकसा आणि आमगाव तालुक्यात प्रत्येकी एक कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहे, तर उर्वरित सहा तालुके पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. मंगळवारी (दि.३१) कोरोनाबाधित आणि मात करणाऱ्यांची संख्या शून्य होती. त्यामुळे गोंदिया जिल्हा लवकरच पूर्णपणे कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे. ही जिल्हावासीयांसाठी निश्चितच दिलासादायक बाब आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने मंगळवारी १८५ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी ९० नमुन्यांची आरटीपीसीआर, तर ९५ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात एकही कोरोनाबाधित आढळला नाही. त्यामुळे कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट शून्य होता. मागील तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची शृून्य नोंद झाली आहे, तर कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळेच कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४४६७२४ नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. यापैकी २२७४५२ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर २१९२७२ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी ४१२०१ नमुने कोरोनाबाधित आढळले. ४०४९६ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.
..........
संसर्ग आटोक्यात पण निष्काळजीपणा नकोच !
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असला तरी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांकडे दुर्लक्ष करू नये, मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. याकडे दुर्लक्ष करून आपणच तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ शकतो. त्यामुळे आवश्यक काळजी घेण्याची गरज आहे.
.................
५६ टक्के लसीकरण
कोरोना विरुद्धच्या लढ्यात लसीकरण हे महत्त्वपूर्ण शस्त्र आहे. त्यामुळेच लसीकरणावर शासन आणि प्रशासनाकडून भर दिला जात आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ७५१७८८७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यापैकी ५८१२२६ नागरिकांना पहिला डोस, तर १७०५६१ नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.