दिलासा : पाच महिन्यात प्रथमच शून्य बाधितांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:18 AM2021-07-05T04:18:59+5:302021-07-05T04:18:59+5:30
गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यात पूर्णपणे ओसरली आहे, तर रुग्णसंख्येतसुद्धा झपाट्याने घट होत आहे. त्यामुळेच जिल्ह्यात कोरोना ॲक्टिव्ह ...
गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यात पूर्णपणे ओसरली आहे, तर रुग्णसंख्येतसुद्धा झपाट्याने घट होत आहे. त्यामुळेच जिल्ह्यात कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ४३वर आली आहे, तर २८ जानेवारीनंतर रविवारी (दि.३) प्रथमच शून्य कोरोनाबाधितांची नोंद झाली. ही निश्चितच जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे.
जून महिन्यापासूनच जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा ग्राफ सातत्याने डाउन होत गेला, तर तिरोडा, देवरी आणि सडक अर्जुनी हे तीन तालुके कोरोनामुक्त झाले आहेत. गोंदिया तालुकावगळता इतर तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या २ ते ३ असून, हे तालुकेसुद्धा लवकरच कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे. कोरोनाबाधितांपेक्षा मात करणाऱ्यांची संख्या अधिक असल्यानेच जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने रविवारी एकूण ७८९ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यात ७०८ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर ७९ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात एकही नमुना कोरोनाबाधित आढळला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने १,९९,५०० नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १,७४,२४५ नमुने निगेटिव्ह आले. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. यांतर्गत २,१८,६२६ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १९,७५,५५३ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४१,१५२ कोरोनाबाधित आढळले असून, त्यापैकी ४०,४०९ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ४३ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, १७४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
..................
राज्यापेक्षा जिल्ह्याचा रिकव्हरी रेट सरस
कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने जिल्ह्याचा रिकव्हरी रेटदेखील राज्यापेक्षा २ टक्क्यांनी अधिक आहे. गोंदिया जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी दर ९८.१९ टक्के आहे, तर राज्याचा रिकव्हरी रेट हा ९६ टक्के आहे. कोरोनाबाधितांचा मृत्युदरसुद्धा स्थिर आहे. त्यामुळे ही जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे.
.....................