आमदार निधीतून १९२ विंधन विहिरींचे काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:46 AM2018-06-23T00:46:00+5:302018-06-23T00:46:21+5:30
आमगाव-देवरी विधान सभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या स्थानिक विकास निधीतून मागील चार वित्तीय वर्षात एकण १९२ विंधन विहिरींचे काम पूर्ण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : आमगाव-देवरी विधान सभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या स्थानिक विकास निधीतून मागील चार वित्तीय वर्षात एकण १९२ विंधन विहिरींचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे आमगाव-सालेकसा आणि देवरी तालुक्यातील शेकडो गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली आहे.यंदा पाणी टंचाईची समस्या सुद्धा जास्त जाणवली नाही. त्यामुळे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी या बोअरवेलीची मोठी मदत होत आहे.
सालेकसा व देवरी तालुक्यात २०१४-१५ या वर्षात मार्चपूर्वी १२ बोअरवेल प्रस्तावित केले. यात सालेकसा तालुक्यात आठ आणि देवरी तालुक्यात चार बोअरवेल मंजूर करण्यात आले. २०१५-१६ या वित्त वर्षात आमदार निधीतून सालेकसा तालुक्यात २९, देवरी तालुक्यात ४१ आणि आमगाव तालुक्यात २६ विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या. २०१६-१७ च्या वित्तीय वर्षात सालेकसा तालुक्यात १६, देवरी तालुक्यात चार आणि आमगाव तालुक्यात १२ बोअरवेल देण्यात आलेत. तसेच २०१७-१८ या वित्तीय वर्षात सालेकसा तालुक्यात १७, देवरी तालुक्यात २१ आणि आमगाव तालुक्यात १४ बोअरवेल मंजूर करण्यात आल्या.
एकंदरीत मागील चार वित्त वर्षात सालेकसा तालुक्यात ७०, देवरी तालुक्यात ७० आणि आमगाव तालुक्यात ५२ बोअरवेल देण्यात आल्या आहेत. या सर्व बोअरवेलचे खोदकाम पूर्ण होवून बोअरवेल तयार करण्यात आले. त्या बोअरवेलचा उपयोग नागरिक करीत आहेत. तिन्ही तालुक्यातील एकंदरीत १९२ बोअरवेलपैकी काही एकदोन बोअरवेलचा अपवाद वगळता सर्व ठिकाणी पुरेसा पाणीसाठा लागला असून भर उन्हाळ्यात लोकांना पाणी मिळत होते. मागील वर्षी जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने गावातील नागरिकांना दुष्काळी व पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली होती. मात्र या बोअरवेलमुळे पाणी टंचाईवर मात करण्यास मदत झाली.
सात ठिकाणी मल्टीस्टेज वाटर ट्रीटमेंट युनिट
आमदार निधीतून विधानसभा क्षेत्रात एकूण सात ठिकाणी मल्टीस्टेज वॉटर ट्रीटमेंट युनिट लावण्यात आले. यात सालेकसा तालुक्यात तीन, देवरी तालुक्यात तीन आणि आमगाव तालुक्यात एक युनिटचा समावेश आहे. सालेकसा तालुक्यात जि.प. प्राथमिक शाळा बिजेपार, जि.प. प्राथमिक शाळा दरेकसा आणि जि.प. प्राथमिक शाळा रामाटोला येथे, देवरी तालुक्यात जि.प. प्राथमिक शाळा मिसपिरी, जि.प. प्राथमिक शाळा पालांदूर आणि जि.प. प्राथमिक शाळा फुटाणा तसेच आमगाव तालुक्यात जि.प. प्राथमिक शाळा चिरचाळबांध येथे युनिट लावण्यात आले.
६४ बोअरवेल प्रस्तावित
आमदार निधीतून चालू वर्षात पुन्हा ६४ बोअरवेल प्रस्तावित असून यात सालेकसा २४, देवरी १६ आणि आमगाव तालुक्यात २४ बोअरवेल प्रस्तावित असून अनेक बोअरवेलचे कामे सुरु झालेली आहेत.