गोठणगाव धान खरेदी केंद्रावर गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 09:56 PM2019-06-27T21:56:43+5:302019-06-27T21:57:27+5:30
गोठणगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्रावर हमालांचा तुटवडा आहे. केंद्रावर बारदाना नाही, नजीकच्या शेतकऱ्यांचे धान रात्री उशीरा संस्थेचे फाटक उघडून घेतले जातात. मात्र सामान्य शेतकऱ्यांवर नो एन्ट्री असल्याने बुधवारी (दि.२६) सकाळी शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रावर गोंधळ घातला. दरम्यान वरिष्ठ अधिकारी आल्यानंतर प्रकरण निवळले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : गोठणगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्रावर हमालांचा तुटवडा आहे. केंद्रावर बारदाना नाही, नजीकच्या शेतकऱ्यांचे धान रात्री उशीरा संस्थेचे फाटक उघडून घेतले जातात. मात्र सामान्य शेतकऱ्यांवर नो एन्ट्री असल्याने बुधवारी (दि.२६) सकाळी शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रावर गोंधळ घातला. दरम्यान वरिष्ठ अधिकारी आल्यानंतर प्रकरण निवळले.
३० जून रोजी शासनाची आधारभूत धान खरेदी केंद्र बंद होणार आहेत. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप धान विक्री केली नाही ते आता लगबग करीत आहेत. यातच मंगळवारी रात्री गोठणगावच्या संस्थेत धान भरलेले दोन ट्रॅक्टर आले. संस्थेतील कर्मचाºयांच्या संगनमताने फाटक उघडून त्यांना प्रवेश देण्यात आल्याचा प्रकार काही शेतकऱ्यांनी बघितला. मात्र तत्पूर्वीच्या धान मोजण्यासाठी संस्थेच्या पटांगणात पडून आहे.अद्यापही ३ ते ४ हजार क्विंटल धानाची मोजणी प्रतिक्षेत आहे. १२ पैकी केवळ ६ हमाल संस्थेच्या कामावर येत असल्याने धान मोजणीसाठी विलंब होत आहे. त्यामुळे शेतकरीच आपल्या धानाची मोजणी करीत असल्याचे चित्र या केंद्रावर आहे.
संस्थेच्या गोदामाच्या व्हरांड्यात व पटांगणात खरेदी झालेला धान खचाखच भरुन आहे.याची उचल करण्याची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात ३० जून रोजी धान खरेदी केंद्र बंद होणार असले तरी केंद्र बंद झाल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत असल्याचे शेतकरी सांगतात. शेतकरी गोंधळ घालत असले तरी शेतकऱ्यांची असलेल्या संस्थेचे पदाधिकारी वाद सोडविण्यासाठी अथवा शेतकऱ्यांची समजूत घालण्यासाठी पुढे येत नसल्याची ओरड आहे.
संस्थेचे केंद्रप्रमुख रोशन राऊत हे आहेत. ते बुधवारी दुपारी संस्थेत आले त्यांनी समजूत घालण्याऐवजी उलट शेतकऱ्यांशी उध्दट वागणूक केली. शेतकऱ्यांना शेवटी पोलिसांशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधावा लागला या प्रकारामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
धान खरेदी केंद्र सुरु झाल्यापासून अनेक केंद्रावर बारदाना व हमालांच्या उणिवेमुळे खरेदी बंद पडल्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत.
आजही अनेक शेतकºयांजवळ धान पडून आहेत. सर्व शेतकºयांचे धान विक्री व्हावेत यादृष्टीने धान खरेदीला मुदतवाढ मिळावी अशी मागणी आहे. यासंदर्भात राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र हा प्रश्न केंद्र शासनाच्या अखत्यारीतील असल्यामुळे अद्याप मुदतवाढ मिळू शकली नसल्याचे सांगण्यात आले.
नियमांचे सर्रास उल्लंघन
आॅनलाईन सातबारा असलेल्या शेतकऱ्यांचेच धान खरेदी करण्याचे शासनाचे निर्देश असतांनाही या खरेदी केंद्रावर हस्तलिखीत सातबाऱ्यावर खरेदी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. आॅनलाईन सातबाऱ्यावर खरेदी करण्याचा नियमाची संस्थेचे सचिव चांदेवार यांना माहितीच नाही. हा प्रकार भंडाराचे प्रादेशिक व्यवस्थापक तसेच नवेगावबांधचे उपप्रादेशिक व्यवस्थापक पाटील यांच्यासमोर उघडकीस आला.याबाबत त्यांनी संस्था सचिवाची कानउघाडणी केली.