सूर्याटोलातील बांध तलावाचे रूप पालटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 09:11 PM2018-03-11T21:11:18+5:302018-03-11T21:11:18+5:30

शहराच्या सुर्याटोला परिसरातील बांध तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीने ९० लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे.

The construction of a tank in Surattala will change | सूर्याटोलातील बांध तलावाचे रूप पालटणार

सूर्याटोलातील बांध तलावाचे रूप पालटणार

Next
ठळक मुद्देसौंदर्यीकरणासाठी ९० लाख रूपये मंजूर : आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नांचे फलित

ऑनलाईन लोकमत
गोंदिया : शहराच्या सुर्याटोला परिसरातील बांध तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीने ९० लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधी अंतर्गत लवकरच निविदा प्रक्रीया पूर्ण करून तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या कामाला गती देण्याचे आदेश राज्य शासनाच्या नियोजन विभागाने ३ मार्च रोजी दिले आहे. यामुळे बांध तलावाचे सौंदर्यीकरण होणार असून बांध तलावाचे रूप पालटणार आहे.
बांध तलावात मोठ्या प्रमाणात गाळ भरलेला असल्यामुळे, तलावाची दुरूस्ती न झाल्यामुळे व तलावातील बहुतांश भागात अतिक्रमण करण्यात आल्याने पावसाळ््यात तलावाचा पाणी रस्त्यावर येत होते. अशात सुर्याटोला, टी.बी.टोली, प्रोफेसर कॉलनी, महावीर कॉलनी परिसरात पाणी भरत होते.
याचे परिणाम रिंग रोड पासून गजानन कॉलनी व अरिहंत कॉलनीतही बघावयास मिळत होते. दरवर्षीच्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी शासनाकडून चार कोटींचा निधी मंजूर करवून एन.एम.डी.कॉलेज-रिंग रोड- रेल्वे क्रॉसिंगच्या पूर्ण नाल्याचे सिमेंटीकरण करवून घेतले. यामुळे पावसाळ््यातील पाण्याची समस्या काही प्रमाणात सुटली होती. मात्र सन २०१३ मधील पावसामुळे या परिसरात पुन्हा पाणी भरले होते.
याकडे लक्ष देत आमदार अग्रवाल यांनी पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांकडून परिसराचे सर्वेक्षण करवून पाण्याची समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यास सांगीतले होते.
तसेच विभागाचा सल्ला घेऊन राज्य शासनाच्या पुर दुरूस्ती व रोकथाम कार्यक्रमांतर्गत ६० लाख रूपयांच्या निधीतून तलावाचे खोलीकरण व पाळीची दुरूस्ती करवून घेतली.
मात्र या तलावाचे सौंदर्यीकरण व्हावे अशी परिसरातील जनता व खुद्द आमदार अग्रवाल यांची इच्छा असल्याने त्यांनी बांध तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी सन २०१४ मध्येच ९० लाख रूपयांचा निधी मंजूर करवून घेतला होता.
मात्र जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाकडून निविदा प्रक्रीया वेळेत पूर्ण करता आली नाही. यातच आर्थिक वर्ष सरल्याने शासनाने नियमानुसार निधी पुढील वर्षी खर्च करण्यावर बंदी लावून निधी परत करण्याचे निर्देश दिले होते.
अशात बांध तलावाच्या सौंदर्यीकरणाचे सुर्याटोलावासीयांचे व आमदार अग्रवाल यांचे स्वप्न अधुरे राहिले असते. मात्र नागरिकांना शुद्ध हवा मिळावी काही वेळ निवांत घालविता यावे यासाठी आमदार अग्रवाल यांनी बांध तलावाचा हा विषय पुन्हा रेटून धरला.
यासाठी त्यांनी विभागीय आयुक्तांपासून राज्य सरकारस्तरावर प्रयत्न करून ९० लाख रूपयांचा निधी सन २०१७-१८ मध्ये निविदा प्रक्रीया पूर्ण करून खर्च करण्याचे आदेश शासनाकडून आणले.
त्यामुळे आता लवकरच निविदा प्रक्रीया पूर्ण झाल्यावर बांध तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू होऊन बांध तलावाचे रूप येत्या काळात पालटणार आहे.
सौंदर्यीकरणात होणार ही कामे
बांध तलावाच्या सौंदर्यीकरणांतर्गत तलावाची पाळ कापली जावू नये यासाठी पिचींग केली जाणार आहे. या पाळीवर नागरिकांना फिरता यावे यासाठी पाथवे तयार केला जाईल. शिवाय पाळीवर भरपूर प्रमाणात प्रकाशाची व्यवस्था रहावी यासाठी स्ट्रीटलाईट तसेच नागरिकांच्या बसण्यासाठी आरामखुर्ची लावण्यात येणार आहे. या सोबतच शेडचे बांधकाम केले जाणार असून फव्वारेही लावले जाणार आहे. तसेच तलावातील पाण्याची निकासी व्हावी यासाठी ओवरफ्लो चॅनल तयार केले जाईल.

Web Title: The construction of a tank in Surattala will change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.