मान्सूनपूर्व सफाईसाठी कंत्राटी कामगार
By admin | Published: June 5, 2016 01:26 AM2016-06-05T01:26:28+5:302016-06-05T01:26:28+5:30
मान्सूनपूर्व सफाई अभियानाला शहरात सुरूवात झाली असून सध्या जेसीबी व पोकलँडच्या माध्यमातून पाणी वाहून नेणाऱ्या मोठ्या नाल्यांची सफाई केली जात आहे.
मनुष्यबळात २० ची भर : शहरातील नालीसफाईसाठी सोमवारचा मुहूर्त
गोंदिया : मान्सूनपूर्व सफाई अभियानाला शहरात सुरूवात झाली असून सध्या जेसीबी व पोकलँडच्या माध्यमातून पाणी वाहून नेणाऱ्या मोठ्या नाल्यांची सफाई केली जात आहे. मात्र छोट्या नाल्यांच्या सफाईसाठी नियमित स्वच्छता कर्मचारी असतानाही विशेष निविदा काढून आणखी २० कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या २० कामगारांच्या कंत्राटदाराकडून सोमवारपासून (दि.६) शहरातील नाल्यांची सफाई केली जाणार आहे.
पावसाचे पाणी साचून राहू नये व शहरवासियांना त्यापासून त्रास होऊ नये यासाठी नगर परिषदेकडून पावसाळ््यापूर्वी सफाई अभियान राबविले जाते. या सफाई अभियानांतर्गत नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडून जेसीबीच्या माध्यमातून शहरातील पाण्याची निकासी करणाऱ्या मोठ्या नाल्यांचा गाळ काढून त्यांना मोकळे केले जाते. याशिवाय सफाई कामगारांकडून शहरातील लहान नाल्यांची सफाई करून पाण्याची निकासी व्हावी यासाठी व्यवस्था केली जाते.
शहरात जेसीबीच्या माध्यमातून मोठ्या नाल्यांची सफाई करण्याचे काम सुरू आहे. याशिवाय शहराच्या आतील भागात असलेल्या नाल्यांची सफाई करण्यासाठी सफाई कामगारांचे एक पथक कंत्राटी तत्वावर घेण्यात आले आहे. आवश्यक असलेल्या ठिकाणी या कामगारांच्या माध्यमातून सफाई करविण्यात येणार आहे. यासाठी नगर परिषदेने निविदा मागविली होती. शुक्रवारी (दि.३) निविदा काढण्यात आली असून उत्कल सफाई संस्थेला हे काम देण्यात आले आहे. यामध्ये २० सफाई कामगारांचा समावेश आहे. त्यांच्याकडून आता सोमवारपासून (दि.६) सफाईचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)
लेटलतिफ कारभार
७ जूनपासून मृग नक्षत्र लागणार असून मान्सून कधीही धडकणार असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे ही सर्व कामे किमान १०-१५ दिवसांपूर्वी आटोपून घ्यायला हवी होती. मात्र स्वच्छता अभियानातील लेटलतिफ कारभारामुळे तीन दिवसांपूर्वी सफाई कामगारांची निविदा उघडण्यात आली. हेच काम अगोदर करून आतापर्यंत नाल्यांच्या सफाईचे काम पूर्ण करणे अपेक्षित होते.