कोरोना आटोक्यात; पण नागरिक सुसाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:21 AM2021-07-16T04:21:16+5:302021-07-16T04:21:16+5:30
गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट आता पूर्णपणे ओसरली असून जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. कोरोनाबाधितांपेक्षा मात करणाऱ्यांची संख्या ...
गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट आता पूर्णपणे ओसरली असून जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. कोरोनाबाधितांपेक्षा मात करणाऱ्यांची संख्या अर्धा टक्क्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक बिनधास्तपणे वागू लागले असून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना आटोक्यात, पण नागरिक सुसाट असल्याचे चित्र आहे. नागरिकांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे.
गुरुवारी जिल्ह्यात एका बाधिताने कोरोनावर मात केली, तर दोन रुग्णांची भर पडली. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने गुरुवारी एकूण १०६१ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात ९४२ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर ११९ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात एक नमुना कोरोना पॉझिटिव्ह आला. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.१८ टक्के आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत २०८५९१ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यांपैकी १८३०८८ नमुने निगेटिव्ह आले. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत २२०४६६ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यांपैकी १९९३८१ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४११६९ कोरोनाबाधित आढळले असून यांपैकी ४०४५३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत १६ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून ४११ स्रावनमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
.................
कोरोना हद्दपार करण्यासाठी नियमांचे करा पालन
जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर असून नागरिकांचे थोडे दुर्लक्ष पुन्हा संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरू शकते. कोरोनाला जिल्ह्यातून पूर्णपणे हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे.
.................