कोरोनाने दिली मातीचे ॠण फेडण्याची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 05:00 AM2020-05-28T05:00:00+5:302020-05-28T05:00:43+5:30
तालुक्यातील ग्राम हिरापुर येथील पाच, ग्राम सटवा येथील एक, ग्राम दवडीपार येथील पाच व ग्राम पुरगाव येथील सहा असे एकूण २२ माजी विद्यार्थी कुणी शिक्षणासाठी, कुणी मजुरीसाठी तर कुणी व्यवसायासाठी परराज्यातून आपापल्या घरी परतले आहेत. नियमानुसार त्या सर्वांना त्यांच्या गावातीलच जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात आले आहे.
दिलीप चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : ज्या शाळेत आपण शिकलो मोठे झालो. ज्या शाळेच्या मातीत खेळलोे आणि आयुष्याची बेरीज वजाबाकी शिकलो. त्या शाळेचे आणि गावच्या मातीचे ॠण फेडण्याची हिच वेळ आहे. हे शब्द आहेत गावातील माजी विद्यार्थ्यांचे. हे २२ माजी विद्यार्थी कोरोनामुळे गावाकडे परतले असून सर्वांना जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात आले आहे. या काळात त्यांनी आपापल्या गावातील शाळांमध्ये सफाई करून शाळेचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे.
तालुक्यातील ग्राम हिरापुर येथील पाच, ग्राम सटवा येथील एक, ग्राम दवडीपार येथील पाच व ग्राम पुरगाव येथील सहा असे एकूण २२ माजी विद्यार्थी कुणी शिक्षणासाठी, कुणी मजुरीसाठी तर कुणी व्यवसायासाठी परराज्यातून आपापल्या घरी परतले आहेत.
नियमानुसार त्या सर्वांना त्यांच्या गावातीलच जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात आले आहे. १४ दिवस क्वारंटाईन ठेवण्याचे शासनाचे आदेश असल्याने या काळात शाळेसाठी काही तरी विशेष केले पाहिजे ही भावना या माजी विद्यार्थ्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. याच दरम्यान शाळा सफाई अभियानाला त्यांनी सुरूवात केली.
वर्षभर शाळेतील शिक्षक व विद्यार्थी शाळेची सफाई व झाडांचे संगोपण करतात. मात्र सुटीत शाळेची दुरवस्था होत असून झाडे मरून जातात. मात्र यंदा सुट्यांमध्येच कोरोनाने डोके वर काढले व नशिबाने क्वारंटाईन करण्यात आलेल्या या माजी विद्यार्थ्यांना शाळेसाठी काही तरी करण्याची संधी मिळाली. या माजी विद्यार्थ्यांनी शालेय परीसरातील स्वच्छता, झाडांना पाणी देणे, झाडांची कटिंग करणे, कचरा काढणे ही सर्व कामे हाती घेतली आणि शाळेचा चेहरामोहराच बदलवून टाकला आहे.
झाडांना दररोज पाणी मिळत असल्याने झाडे ही डोलू लागली आहेत. त्यामुळे गावखेड्यातील जिल्हा परिषद शाळांचे रूपडे पालटल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
यावे ज्ञानासाठी... निघावे सेवेसाठी
ज्या शाळेत बालपण गेले. त्या मंतरलेल्या दिवसाची आठवण येते. शहराच्या झगमगाटीत गावातील वैभवाचा विसर पडला होता. कोरोना ने सर्व काही शिकविले. बालपणी ज्ञानासाठी आलो होतो आता नशिबाने शाळेच्या सेवेसाठी उपलब्ध आहो.
-एक माजी विद्यार्थी, पुरगाव
-------------------
हिरापूर येथील ५ माजी विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेत स्वमर्जीने शालेय परीसरातील झाडांना पाणी देणे व स्वच्छता मोहीम राबविण्याचे काम हाती घेतले आहे .
- भुपेश गौतम
उपसरपंच, हिरापूर