गोंदिया : देशात कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक वाढला असून, त्यातही राज्यातील स्थिती अधिकच गंभीर झाली आहे. राज्यात सर्वाधिक संक्रमण असल्याने बाधितांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. त्याचे पडसाद आता जिल्ह्यातही बघावयास मिळत आहे. जिल्ह्यात बाधित व मृतांची संख्या वेगाने वाढत असून, हा वाढता धोका पाहता आता राज्य शासनाने लॉकडाऊन लावला आहे. परिणामी कोरोनाची भीती बघता नागरिकांनी प्रवास टाळण्यास सुरुवात केली असून, त्याचा परिणाम राज्य परिवहन महामंडळावर पडत असून, एसटी तोट्यात येत आहे.
मागीलवर्षी एसटीची चाके थांबली होती व त्यामुळे एसटी महामंडळाला चांगलाच फटका बसला होता. त्यानंतर जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात थोडाफार दिलासा देणारे चित्र निर्माण झाले असतानाच, आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. यामुळे राज्य शासनाने कठोर निर्बंध लावल्याने नागरिकांनीही प्रवास टाळला आहे. हेच कारण आहे की, भरभरून धावणारी एसटी आता मोजक्याच प्रवाशांना घेऊन धावत आहे. याचा फटका आगाराच्या तिजोरीवर पडत असून, असेच सुरू राहिल्यास डिझेल टाकण्यासाठीही पैसे राहणार नाहीत, अशी स्थिती येणार, यात शंका नाही.
-------------------------------
- आगारातील एकूण बसेस - ८०
- एकूण कर्मचारी - ३१५
- चालक- १३३
- वाहक - १०३
- रोजच्या फेऱ्या - २२०
- रोजचे नुकसान- ३ ते ४ लाख रुपये
-------------------------------
मागील वर्षही गेले तोट्यात
मागीलवर्षी मार्च महिन्यातच कोरोनाचा कहर सुरू झाला होता व २४ मार्चपासून अवघ्या देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. यात प्रवासावरही निर्बंध होते व त्यामुळे एसटीची चाके थांबली होती. यामुळे एसटी चांगलीच तोट्यात गेली होती. आता परिस्थिती हळूवार सुधारताना दिसून येत होती, तोच पुन्हा एकदा कोरोनाने आपला रंग दाखवून दिला. यामुळे आता नागरिकांनी पुन्हा प्रवास थांबविला असून, त्याचा फटका आगारावर पडताना दिसत आहे.
----------------------------
परिस्थिती बघूनच फेऱ्यांचा विचार
जिल्ह्यात सध्या आहे त्या फेऱ्या सुरू आहेत. मात्र मध्यप्रदेशला जाणाऱ्या फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. फेऱ्या बंद करण्याबाबत सध्या काहीच सूचना नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील फेऱ्या नियमित सुरू आहेत. आता प्रवासी घटत असल्याने एसटी कमी प्रवाशांना घेऊन धावत आहे. मात्र फेऱ्या बंद करण्याचा विचार आतापर्यंत करण्यात आलेला नाही. पुढील परिस्थिती बघूनच फेऱ्यांचा विचार केला जाणार.
----------------------------
कोट
कोरोना उद्रेकामुळे नागरिकांकडून प्रवास टाळला जात आहे. याचा फटका एसटीवर पडत असून, आगाराचे दररोज ३ ते ४ लाख रुपयांचे उत्पन्न घटले आहे. प्रवासी कमी झाल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढचे नियोजन केले जाईल.
- संजना पटले,
आगारप्रमुख, गोंदिया.