नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :जिल्ह्यातील बहुतांश शाळांतील बसेसमध्ये वाहतूक नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत ठेवून प्रवास करावा लागतो. असे करणाऱ्या वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात येतोच. तरीही शाळा प्रशासन सुधारत नाही. त्यामुळे आता सरळ मुख्याध्यापकांवरच गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.घरापासून शाळेचे अंतर दूर असल्यास शाळेत जाण्यासाठी अनेक खासगी वाहनांचा वापर होत असतो. परंतु त्या वाहनांमध्ये वापरण्यात येणाऱ्या स्कूल बसचा कधी परवाना नसतो. कधी मोटारवाहन कायद्याच्या नियमात असणाऱ्या सोयी सुविधा राहत नाही. भंगार गाड्यांना स्कूल बस म्हणून चालविले जाते. त्यामुळे त्या वाहनांनी विद्यार्थ्यांचा कधी अपघात होईल हे सांगता येत नाही. चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात टाकून होत असलेली वाहतूक थांबविण्यासाठी स्वत: मुख्याध्यापक-प्राचार्य यांनीच जबाबदारी स्वीकारावी अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तरतूद शिक्षण विभागाने करावी, असे पत्र उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चव्हाण यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे.या पत्राची माहिती गोंदियाचे पोलीस अधीक्षक तथा जिल्हा स्कूल बस सुरक्षीतता समिती अध्यक्षांनाही दिली आहे. जिल्ह्यात अनेक कॉन्व्हेंट व शाळेत परवाना नसलेल्या वाहनांचा स्कूल बस म्हणून वापर करण्यात येतो. या वाहनांवर कारवाई करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नियोजन करीत आहे. परंतु या सर्व प्रकाराला जबाबदार असलेल्या मुख्याध्यापकांवर कारवाई करावी तसेच त्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हे दाखल करावे असे पत्र शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
२५ दिवसांत ५ मुख्याध्यापकांना दणकापरवाना नसताना बस मधून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या ५ शाळांच्या मुख्यापकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा असे पत्र उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चव्हाण यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यात ग्राम सरांडी येथील प्रगती हायस्कूल आश्रमशाळेतील बस क्रमांक एमएच ३१-बीबी २९२५ ला स्कूल बसची परवानगी नसताना १९ विद्यार्थ्यांची वाहतूक ३ जानेवारी रोजी करीत होते. रावणवाडी येथील दिल्ली पब्लीक स्कूलच्य बस क्रमांक एमएच ३५-पी २१३२ मध्ये एका विद्यार्थ्याची वाहतूक ५ जानेवारी केली जात होती. तिरोडा येथील असीम सराफ सेंट्रल अॅकेडमीच्या बस क्रमांक एमएच ३५-पी ०५७३ मध्ये २० विद्यार्थी बसवून १९ डिसेंबर रोजी वाहतूक केली जात होती. गोरेगाव येथील एम.सी.पी. स्कूलच्या बस क्रमांक एमएच ३५-ई १७७२ मध्ये २० डिसेंबर रोजी १५ विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात होती. ग्राम मोगर्रा येथील जिल्हा परिषद स्कूलच्या बस क्रमांक एमएच ३५-एजी ०२४३ मध्ये ५० विद्यार्थी बसवून त्यांची वाहतूक केली जात होती. मोटार वाहन निरीक्षकांनी स्कूल बसची तपासणी केली असता त्यात ही बाब पुढे आली. त्यामुळे या ५ ही शाळांच्या मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याचे पत्र शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.परवाना नसतांना विद्यार्थ्यांचा प्रवास करविणे ही बाब अत्यंत चुकीची आहे. या प्रकाराला मुख्याध्यापक जबाबदार आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यास पुढे ते अशी चुकी करणारच नाहीत यासाठी कडक पवित्रा घेण्यात आला आहे.-विजय चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, गोंदिया.