गोंदिया : वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश देण्यासाठी नीटची परीक्षा न देताही बारावीचे गुण ग्राह्य धरून प्रवेश देण्याचा धक्कादायक निर्णय तमिळनाडू सरकारने घेतला आहे. या निर्णामुळे महाराष्ट्रात नीट देणारे विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. तमिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही असा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी प्रतिक्रीया विद्यार्थी व पालकांमधून उमटत आहे.
वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर नीट ही परीक्षा घेतली जाते; परंतु तमिळनाडू सरकारने या प्रवेश परीक्षा विरोधात विधेयक सादर करून ही परीक्षा न देता वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया राज्य सरकारने घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता इतर राज्य याच कायद्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतील. या परीक्षेसंदर्भात अनेकदा वादही झाले आहेत. दोनवेळा ही परीक्षा बंदही झाली होती तेव्हा राज्यांनी सीईटीच्या माध्यमातून वैद्यकीय अभ्यासात प्रवेश देण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा नीट परीक्षा सुरू करण्यात आली. नीटच्या माध्यमातून ३० टक्के तर सीईटीच्या माध्यमातून ७० टक्के वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा भरल्या जातात. या निर्णयामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांत संभ्रम निर्माण झाला आहे.
.....................................
काय आहे तमिळनाडू सरकारचा निर्णय?
एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर पालक व विद्यार्थ्यांचा रोष पाहून तमिळनाडू सरकारने नीट परीक्षेत राज्यातील विद्यार्थ्यांना सूट देणारे विधेयक विधानसभेत मांडले. ते संमतही झाले. वैद्यकीय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नीटची गरज नाही, असा त्या विधेयकाचा अर्थ आहे. सरकारी शाळेतील ७.५ टक्के विद्यार्थ्यांना प्राधान्य व बारावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश दिला जाईल.
.....................
शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ
१) राज्यातही याच धर्तीवर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी सोय करण्याची गरज आहे. हुशार विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी तमिळनाडू सरकारच्या निर्णयासारखा निर्णय महाराष्ट्र सरकारनेदेखील घ्यायला हवा.
- राजू पटले, आमगाव.
..........
तमिळनाडू सरकारने घेतलेला निर्णय संभ्रमात टाकणारा आहे. देशातील सर्वच विद्यार्थ्यांची गुणवत्ता माेजण्यासाठी नीटची परीक्षा घेणे आवश्यक आहे. हुशार विद्यार्थ्याला स्पर्धेत टिकूनच यश मिळवायचे असते.
- संतोष चंद्रिकापुरे, किडंगीपार
..............
विद्यार्थी म्हणतात तयारीचाच खर्च मोठा
नीटच्या परीक्षेची भीती विद्यार्थ्यांमध्ये असते. आपण ही परीक्षा उत्तीर्ण करू का? हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात असतो. याच्या तयारीसाठी क्लासचा खर्च उचलणे सामान्यांना अवघड आहे.
-भाविनी पाऊलझगडे, विद्यार्थिनी.
.......
नीटचा अभ्यासक्रम अवघड आहे. या अभ्यासक्रमाची तयारी करताना क्लास करावाच लागतो. परंतु क्लासला लागणारा खर्च मोठा असल्याने सर्वसामान्य हतबल होतात. त्यात अभ्यासक्रम अवघड असल्याने अनेकांना नापास होण्याची भीती असते. १२ वीच्या गुणांवरही प्रवेश देण्याची सोय करावी.
- त्रिवेणी शेंडे, विद्यार्थिनी.