परिसरातील रेतीघाटांचा लिलाव करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 05:00 AM2020-12-14T05:00:00+5:302020-12-14T05:00:22+5:30
परिसरातील रेती घाटाची लिलाव प्रक्रिया गेल्या २ वर्षांपासून खोळंबली आहे. याचे कारण जाणून घेतले असता रेती उपसा केल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत असल्याचे कारण पुढे करुन रेतीघाटांचा लिलाव करणे थांबविण्यात आल्याचे समजले आहे. परंतु हे कारण संयुक्तीक वाटत नाही, उलट लिलाव प्रक्रिया थांबविल्यामुळे रेती चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. चोरीचे प्रकरण दडपण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे खिसे गरम करण्याचा वैयक्तीक फायद्याचा उद्देश सफल होत असल्याचा आरोप नागरीक करीत आहेत.
लाेकमत न्यूज नेटवर्क
केशोरी : या परिसरातील वडेगाव (बंध्या) व धोबल या रेतीघाटांचा लिलाव न केल्यामुळे घरकुल व घरांचे बांधकाम अडचणीत आले आहे. घरबांधणीसाठी रेती हे अत्यंत महत्वाचे घटक असून रेतीशिवाय घर बांधकाम पूर्णत्वास जावू शकत नाही. हे शासनास माहिती असताना सुध्दा रेती घाट लिलाव प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे शासनाला मिळणारे लाखो रुपये बुडत आहेत. याची जाण ठेवून केशोरी परिसरातील रेती घाट लिलाव करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
परिसरातील रेती घाटाची लिलाव प्रक्रिया गेल्या २ वर्षांपासून खोळंबली आहे. याचे कारण जाणून घेतले असता रेती उपसा केल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत असल्याचे कारण पुढे करुन रेतीघाटांचा लिलाव करणे थांबविण्यात आल्याचे समजले आहे. परंतु हे कारण संयुक्तीक वाटत नाही, उलट लिलाव प्रक्रिया थांबविल्यामुळे रेती चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. चोरीचे प्रकरण दडपण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे खिसे गरम करण्याचा वैयक्तीक फायद्याचा उद्देश सफल होत असल्याचा आरोप नागरीक करीत आहेत. रेतीघाटांचा लिलाव होत नसल्यामुळे मंजूर झालेल्या घरकुलांचे काम अडले आहेत.
रेतीशिवाय घरकुल बांधकाम कसे करावे असा प्रश्न घरकुल लाभार्थ्यांना पडला आहे. जिल्हा प्रशासन हेतुपुरस्सर शासनाला मिळणाऱ्या रेती घाट लिलावापासून मिळणारे लाखो रुपयांचे नुकसान करीत आहे असा आरोप करीत रेती चोरी करणाऱ्यांकडून अवैधरित्या चिरीमीरी घेवून लाखो रुपयाची माया जमविणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी शासनानेच मार्ग मोकळा करुन दिल्याचे बोलले जात आहे.
रेती चोरी प्रकरणाला शासनच जबाबदार आहे हे निश्चित समजून कुंपणच शेत खात असेल तर यावर नागरिकांचा काहीच उपाय चालणार नाही असे वाटून जात आहे. रेतीघाट लिलाव प्रक्रिया थांबल्यामुळे घरकुलासह इतर लोकांच्या घर बांधणीचे काम प्रभावित झाले आहेत. यामुळे मात्र रेती चोरी प्रकरणे वाढत असून या प्रकरणी शासनच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. रेती चोरी थांबविण्यासाठी रेतीघाटांचा लिलाव होणे गरजेचे आहे. करीता जिल्हा प्रशासनाने याची दखल घेवून परिसरातील रेतीघाटांचा लिलाव करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.