डोंगरगड-बल्लारशाह मार्गावर रेल्वेगाडीची मागणी
By admin | Published: September 14, 2014 12:01 AM2014-09-14T00:01:29+5:302014-09-14T00:01:29+5:30
गोंदिया-चंद्रपूर व गोंदिया-डोंगरगड रेल्वेमार्गाचा परिसरातील गोरगरीब आणि सर्वसाधारण प्रवाश्यांसाठी मोठा आधार आहे. मात्र दुपारीपाळीत या मार्गावर रेल्वेगाडीची सोय नसल्याने या भागातील नागरिकांना
सौंदड : गोंदिया-चंद्रपूर व गोंदिया-डोंगरगड रेल्वेमार्गाचा परिसरातील गोरगरीब आणि सर्वसाधारण प्रवाश्यांसाठी मोठा आधार आहे. मात्र दुपारीपाळीत या मार्गावर रेल्वेगाडीची सोय नसल्याने या भागातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. येणाऱ्या नवरात्रीत वाढणारी प्रवाशांची गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाने गोंदिया-चंद्रपूर (बल्लारशाह) व गोंदिया-डोंगरगड मार्गावर अतिरिक्त रेल्वेगाड्या सुरू करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.
गोंदिया-चंद्रपूर मार्गावर चंद्रपूर येथे प्रसिध्द कालीमातेचे मंदिर आहे. गोंदिया-डोंगरगढ मार्गावर डोंगरगड येथे प्रसिध्द बम्लेश्वरी मातेचे देवस्थान आहे. या दोन्ही ठिकाणी मातेचे दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी जातात. त्यांच्यासाठी नवरात्री उत्सवादरम्यान चंद्रपूर-डोंगरगड व डोंगरगढ-चंद्रपूर रेल्वेगाडी चालविण्यात यावी जेणेकरून महाराष्ट्र, मध्यप्रदेश व छत्तीसगढ राज्यातील लाखो भाविक भक्तांना दर्शनाचा लाभ घेण्याची सोय उपलब्ध होईल, अशी रेल्वे प्रवाशांची अपेक्षा आहे. गोंदिया हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे.
आठही तालुक्यात गोंदिया हे मध्यभागी असल्याने विविध कामासाठी जिल्हावासीयांना गोंदियाला यावे लागते. काम आटोपल्यावर मात्र गावाला जाण्यासाठी दुपार पाळीत गाडी नसल्याने गोरेगाव, सडक/अर्जुनी, सौंदड, पांढरी, नवेगावबांध, अर्जुनी/मोरगाव, वडेगाव, अरुणनगर, वडसा येथील नागरिकांना व विद्यार्थ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. हीच अवस्था गोंदिया-दर्रेकसा परिसरातील नागरिकांची आहे.