१००० हेक्टरला मिळणार धापेवाडा प्रकल्पाचे पाणी
By admin | Published: January 15, 2016 02:33 AM2016-01-15T02:33:05+5:302016-01-15T02:33:05+5:30
धापेवाडा सिंचन प्रकल्पाचे पाणी रबी पिकांना मिळण्याकरीता धापेवाडा सिंचन प्रकल्प कार्यालयात आ.विजय रहांगडाले यांच्या अध्यक्षतेत सभा घेण्यात आली.
तिरोडा : धापेवाडा सिंचन प्रकल्पाचे पाणी रबी पिकांना मिळण्याकरीता धापेवाडा सिंचन प्रकल्प कार्यालयात आ.विजय रहांगडाले यांच्या अध्यक्षतेत सभा घेण्यात आली. ३ लाख १५ हजार रुपयांचे विद्युत देयक प्रलंबित असल्यामुळे रबीला पाणी देण्याकरिता अधिकाऱ्यांनी अडचण दर्शविली. पण आ.रहांगडाले यांच्या पुढाकाराने ही अडचण दूर करण्यात आली.
महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून धापेवाडा सिंचन प्रकल्पाचा वीज पुरवठा खंडित न करता शेतकऱ्यांना पाणी देण्याचे आश्वासन महावितरणने दिले. उपस्थित शेतकऱ्यांनी सभेत त्यांच्याकडे असलेली पाणीपट्टीची रक्कम जमा करण्याबाबत हमी दिली व त्यामधून उर्वरीत वीज बिल भरण्यात येईल, असे ठरविण्यात आले.
धापेवाडा सिंचन प्रकल्पाचे अंदाजे ९० लक्ष रुपये थकीत असल्यामुळे वीज बिल भरणे अशक्य असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांशी समन्वय साधावा व शेतकऱ्यांनी पाणी पट्टीची असलेली थकबाकी भरुन योजना सुरळीत चालविण्याकरीता सहकार्य करावे असे आवाहन आ.विजय रहांगडाले यांनी केले. (शहर प्रतिनिधी)