जिल्ह्यात ६९७ मजुरांनाच काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 06:00 AM2019-10-10T06:00:00+5:302019-10-10T06:00:18+5:30
डॉ. विजय सूर्यवंशी किंवा अभिमन्यू काळे या दोन जिल्हाधिकाऱ्यांनी गोंदिया जिल्ह्यातील गोरगरीब मजुरांच्या हाताला काम देत गोंदियाचे नाव देशात लौकीक केले होते. परंतु त्याच जिल्ह्यातील लाखो मजुरांना आजघडीला बेरोजगार राहण्याची पाळी मागील दोन वर्षात आली आहे. वर्तमान जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी रोहयोच्या कामाकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे.
नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत दोन-दोन लाख मजुरांच्या हाताला काम देणारा गोंदिया जिल्हा देशात एकेकाळी अग्रस्थानी होता. परंतु आता या गोंदिया जिल्हा राहेयोचे काम देण्यात सपशेल अपयशी ठरला आहे. आदिवासी व नक्षलग्रस्त असलेल्या गोंदिया जिल्ह्याची लोकसंख्या १४ लाखाच्या घरात आहे. परंतु या १४ लाखापैकी फक्त ६९७ मजुरांच्याच हाताला आजघडीला काम आहे.
बेरोजगारीवर मात करण्यासाठी व प्रत्येक कुटुंबाचे दरडोई उत्पन्न वाढावे यासाठी रोड, रस्ते, नाल्या, पूल, तलाव खोलीकरण, भातखाचर, विहीर, शेततळी, कालवा दुरूस्ती, नाला सरळीकरण, पाटदुरूस्ती, शोषखड्डे, वृक्षलागवड, कंपोस्ट खत, नापेड खत, शेळ्या गाईचा गोठा, जमीन सपाटीकरण, घरकुल व शौचालय ही कामे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून केली जातात.
गोंदिया जिल्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे व डॉ.विजय सृूर्यवंशी यांंनी गोंदिया जिल्ह्याचा विकास करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून गोंदिया जिल्ह्यातील दोन लाखाहून अधिक लोकांना या रोहयोच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करवून दिला होता. परिणामी रोहयोची उत्तम अंमलबजावणी करणारा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्याचे नाव देशात लौकीक झाले होते. परंतु कारभार बदलला आणि रोजगार हिरावल्या गेला. देशातील मोठ्या शहरात असलेल्या नामवंत कंपन्या व लघुउद्योग जसे नोटबंदीमुळे बंद झाले आणि रोजगार हिरावल्या गेला तसाच रोजगार गोंदिया जिल्ह्यातून जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे बदलल्यानंतर रोहयोच्या कामावर असलेल्या मजुरांना आता काम मिळेनासे झाले आहे.
डॉ. विजय सूर्यवंशी किंवा अभिमन्यू काळे या दोन जिल्हाधिकाऱ्यांनी गोंदिया जिल्ह्यातील गोरगरीब मजुरांच्या हाताला काम देत गोंदियाचे नाव देशात लौकीक केले होते. परंतु त्याच जिल्ह्यातील लाखो मजुरांना आजघडीला बेरोजगार राहण्याची पाळी मागील दोन वर्षात आली आहे. वर्तमान जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी रोहयोच्या कामाकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे लाखो मजुरांच्या ऐवजी आता फक्त ६९७ मजूर काम करीत आहेत. आणि ते मजूर फक्त मोजक्या घरकुल व वृक्ष लागवडीच्या कामावर आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील ५४७ ग्राम पंचायतींना रोहयोची ५० टक्के काम करायची असतात परंतु ग्रामपंचायत स्तरावर मजुरांची मागणी असतांना काम नसल्याचे सांगून मजुरांना काम दिले जात नाही.
वृक्षलागवड व घरकुलाची १७४ कामे सुरू
वृक्षलागवडची ४७ कामे, गोठ्याची ८ कामे व घरकुलाची ११८ कामे जिल्ह्यात सुरू आहेत.वृक्षलागवडीची तिरोड्यातील सात कामांवर ४० मजूर, आमगाव तालुक्यात ४ कामांवर १२ मजूर, गोरेगाव तालुक्यात ३३ कामांवर १०७ मजूर व अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ३ कामांवर १२ मजूर अश्या ४७ कामांवर १७१ मजूर कार्यरत होते. गोठ्यांची कामे तिरोडा तालुक्यातील ५ कामांवर ३२ मजूर, देवरीच्या एका कामावर ४ मजूर, अर्जुनी-मोरगावातील ४ कामांवर २८ मजूर अश्या ८ कामांवर ६३ मजूर, घरकूलात तिरोडा तालुक्यातील २९ कामांपैकी ८४ मजूर, आमगावातील २६ कामांवर ७७ मजूर, देवरी तालुक्यातील ५९ कामांवर २२५ मजूर, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ४ कामांवर २८ मजूर असे एकूण ११८ कामांवर ४१४ मजूर कार्यरत आहेत.
तीन तालुक्यात एकही मजुराला काम नाही
गोंदिया जिल्ह्यात आठ तालुके आहेत. त्यापैकी एकही तालुक्यात समाधानकारक एकही काम सुरू नाहीत. परंतु गोंदिया, सालेकसा व सडक-अर्जुनी या तीन तालुक्यात एकही मजुराच्या हाताला काम नाही. कामाअभावी मजुरांचे स्थलातंर होत आहे. कामाच्या शोधात मजूरांचा लोंढा शहराकडे जात आहे. परंतु लोकांच्या हाताला काम देण्यासाठी जिल्हा प्रशासन अपयशी ठरला आहे.
किती मजुरांना मिळाला कामगारांचा दर्जा?
रोहयोच्या कामावर सतत ९० दिवस काम करणाऱ्या मजुरांना कामगारांचा दर्जा देण्याचे तरतूद सरकारने केली आहे. परंतु डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आपल्या कार्यकाळात गोंदिया जिल्ह्यातील किती मजुरांना सतत ९० दिवस काम दिले याची आकडेवारी पाहिली तर ती नक्कीच रोहयोच्या संदर्भात उदासिन आहे. रोहयोच्या कामावर सतत ९० दिवस काम करणाºया मजुरांना कामगारांचा दर्जा दिला जातो.त्याचे लाभही देण्यात येतात. परंतु कामच न दिल्यामुळे कामगार कायद्याच्या लाभापासून मजूर वंचित आहेत.