जिल्हा होणार ‘एलईडी’ने प्रकाशमान
By admin | Published: January 19, 2016 02:55 AM2016-01-19T02:55:50+5:302016-01-19T02:55:50+5:30
विजेचा वाढत असलेला वापर लक्षात घेता त्यावर आवर घालण्याच्या दृष्टीने ग्राहकांना आता एलईडी बल्बचे वितरण
आजपासून वाटप : प्रत्येक ग्राहकाला मिळणार १० बल्ब
गोंदिया : विजेचा वाढत असलेला वापर लक्षात घेता त्यावर आवर घालण्याच्या दृष्टीने ग्राहकांना आता एलईडी बल्बचे वितरण करण्याचा कार्यक्रम राबविला जात आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या या ‘डोमेस्टिक इफीशियंट लाईटनिंग प्रोग्राम’ अंतर्गत प्रत्येक वीज मीटर धारकाला (ग्राहकाला) हे एलईडी बल्ब दिले जाणार असून मंगळवारपासून (दि.१९) जिल्ह्यात हा कार्यक्रम सुरू होणार आहे. कमी वीज जाळून अधिक उजेड देणारे एलईडी बल्ब असल्याने आता जिल्हा एलईडीच्या उजेडाने प्रकाशमान होणार आहे.
विजेच्या वाढत्या वापरामुळे वीज निर्मितीसाठी खनिज संपत्तीचा ऱ्हास होत चालला आहे. यावर वेळीच नियंत्रण घालण्यात आले नाही तर खनिज संपत्तींसह पर्यावरणावरही धोकादायक परिणाम होणार यात शंका नाही. याकरिता वीजेची वाढत चाललेली मागणी व त्यावर आळा घालण्याच्या उद्देशातून केंद्रीय उर्जा मंत्रालयाने एलईडी बल्ब वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. एलईडी बल्ब कमी वीज जाळून जास्त उजेड देतात. जानेवारी २०१४ पासून सुरू झालेल्या या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक वीज मीटर धारकाला (ग्राहकाला) एलईडी बल्ब दिले जाणार आहे.
केंद्र शासनाच्या एनर्जी इफिशिएंसी सर्विसेस लिमीटेड (ईईएसएल) या कंपनीच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबविला जात असून यासाठी जिल्हास्तरावर एजंसी देण्यात आली आहे. राज्यात आॅक्टोबर २०१४ पासून हा कार्यक्रम सुरू झाला असून त्यांतर्गत रत्नागिरी, सिंधूदुर्ग, अमरावती, यवतमाळ, जळगाव, औरंगाबाद, पूणे, कल्याण, मुंबई, धुळे, नागपूर व वर्धा येथे बल्ब विक्री करण्यात आले आहेत. आता गोंदिया जिल्ह्यात हा कार्यक्रम सुरू होणार असून जिल्ह्यात सुमारे दोन लाख वीज मीटर धारक असल्याने त्यांना हे एलईजी बल्ब पुरविण्याच्या दृष्टीने एजन्सीची तयारी सुरू आहे.
मंगळवारपासून (दि.१९) जिल्हयात वितरणाचे काम सुरू होणार असल्याची माहिती आहे. प्रायोगीक तत्वावर महावितरणचे मुख्य अभियंता जनवीर, अधिक्षक अभियंता कबीरदास चव्हाण, सहायक अभियंता सुहास धामनकर यांच्या हस्ते काही लोकांना सोमवारी बल्बचे वितरण करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)
बिलातून कापणार बल्बचे पैसे
४या बल्ब वितरणासाठी काही अटी ठरवून देण्यात आल्या आहेत. यामध्ये एका ग्राहकाला जास्तीत जास्त १० व किमान दोन बल्ब द्यावयाचे आहेत. त्यात सहा बल्ब रोख तर चार बल्ब हप्त्यांनी घेता येतील. मात्र अगोदर सहा बल्ब रोख स्वरूपात घेतल्यानंतर उरलेले चार बल्ब हप्त्याने घेता येणार नाही. हप्त्याने बल्ब घेण्यासाठी ग्राहकाला त्यांचे ओळखपत्र व आताच्या वीज बिलाची झेरॉक्स द्यायची आहे. फक्त १० रूपये एका बल्बसाठी या पद्धतीने द्यायचे असून उर्वरीत रक्कम ग्राहकाच्या वीज बिलातून दरमहा कपात केली जाणार आहे. विशेष म्हणजे ही सुविधा फक्त घरगुती वीज मीटर धारकांसाठी आहे. व्यवसायीक वीज मीटरधारकांना मात्र १० बल्ब रोख स्वरूपातच घ्यावे लागणार आहेत.
कसे राहणार हे बल्ब?
४हे बल्ब केंद्र शासनाने तयार करवून घेतलेले असून त्यावर ‘डीईएलपी’ लिहिलेले राहणार आहे. प्रत्येकी सात वॉल्टचे हे बल्ब असून त्यांची किंमत सुमारे ४०० रूपये आहे. मात्र केंद्र शासनाने हा विशेष कार्यक्रम राबविला असल्याने ग्राहकांना प्रत्येकी १०० रूपये दराने बल्ब दिले जात आहेत. हे बल्ब ग्राहकांना घेता यावे यासाठी वीज विभागाच्या ३६ शाखा कार्यालय, नऊ उप विभागीय कार्यालय, वीज बिल संकलन केंद्रात उपलब्ध करवून दिले जातील. शिवाय गर्दीच्या ठिकाणांवरही स्टॉल्स लावून त्यांची विक्री केली जाणार आहे. या बल्बची तीन वर्षांची गॅरंटी राहणार असून एखादा बल्ब खराब निघाल्यास जिल्ह्यातील कोणत्याही केंद्रावर बल्ब खरेदी करतानाची पावती दाखवून ते परत करता येतील.
केंद्र शासनाचा हा अत्यंत महत्वपूर्ण कार्यक्रम आहे. ग्राहकांनी बल्ब घेताना त्यावर ‘डीईएलपी’ बघून व पूर्ण खात्री करूनच बल्बची खरेदी करावी.
कबीरदास चव्हाण
अधीक्षक अभियंता, गोंदिया