गोंदिया : नागपूर विभागाकडून टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांच्या सेवा समाप्तीचे आदेश देण्यात आले आहेत. असे निर्देश इतर विभागाकडून निघण्याचे संकेत आहेत. याअनुषंगाने शिक्षक भारती गोंदिया यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या नावे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कच्छवे यांना दिलेल्या निवेदनातून मागणी केली आहे.
टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी शिक्षकांना तीन संधी देण्यात आल्या होत्या; परंतु टीईटी परीक्षा २०१८ नंतर न झाल्यामुळे संबंधित शिक्षकांना केवळ एकच संधी मिळाली आहे. अशा सर्व शिक्षकांना तीन संधी देण्यात याव्यात. संबंधित शिक्षकांवर सेवा समाप्तीचे येणारे संकट टाळावे व इतर विभागांकडून असे आदेश येणार नाहीत याबाबत आपल्या स्तरावरून कार्यवाही व्हावी, अल्पसंख्याक संस्थांच्या शाळांसाठी टीईटी बंधनकारक असल्याचा शासन निर्णय २०१८ साली जाहीर करण्यात आला. या शासन निर्णयानंतर तब्बल १८ महिन्यांनंतर शासनामार्फत टीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात आले. तोपर्यंत टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याबाबत शासनाने दिलेली मुदत संपली होती. शासनाच्या या धोरणामुळे शासनाने ठरवून दिलेला कालावधी उलटून गेल्यानंतर उत्तीर्ण होऊनही शिक्षकांच्या सेवा धोक्यात आल्या आहेत. आणि अनुत्तीर्ण शिक्षकांना केवळ एकच संधी प्राप्त झाली आहे. जे शिक्षक टीईटी उत्तीर्ण आहेत; परंतु परीक्षेचा निकाल ३० मार्च २०१९ नंतर उशिरा लागल्यामुळे उत्तीर्ण होऊन सुद्धा या शिक्षकांवर अन्याय होत आहे. सर्व शिक्षकांवर टीईटी परीक्षा लादून त्यांच्या सेवा समाप्तीचे निर्णय घेण्याबाबतचा शासन निर्णय अन्यायकारक आहे. संबंधित शिक्षकांच्या सेवेत सेवा सातत्य ठेवण्यात यावे व सेवा संरक्षण द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष महेंद्र सोनवाने, जिल्हासचिव बी. ए. जांगळे व सदस्यांचा समावेश होता.