निकालानंतर सर्वच पक्षांचे वर्चस्वाचे दावे - प्रतिदावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:31 AM2021-01-19T04:31:12+5:302021-01-19T04:31:12+5:30
गोंदिया : ग्रामीण भागातील राजकारण आणि विकासासाठी महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल सोमवारी (दि. १८) जाहीर झाले. निकालानंतर ...
गोंदिया : ग्रामीण भागातील राजकारण आणि विकासासाठी महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल सोमवारी (दि. १८) जाहीर झाले. निकालानंतर स्थानिक सर्वच प्रमुख पक्षांनी आपल्या पक्षाची सर्वाधिक ग्रामपंचायतींवर सत्ता आल्याचे दावे केले आहेत.
एकूण १८१ ग्रामपंचायतींपैकी ६९ ग्रामपंचायतींवर भाजपने, ८१ ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीने आपले उमेदवार निवडून आल्याचा दावा केला आहे, तर ३१ ग्रामपंचायतींवर अपक्षांची सत्ता आली आहे.
जिल्ह्यातील एकूण १८९ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. मात्र, यापैकी ८ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध पार पडल्याने प्रत्यक्षात १८१ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. त्यानंतर सोमवारी मतमोजणी करण्यात आली. यात भाजपने ६९, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ८१ ग्रामपंचायतीत वर्चस्व स्थापन करण्यात यश आल्याचे दावे - प्रतिदावे त्या त्या पक्षांच्या नेत्यांनी केले आहेत. पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी केलेल्या दाव्यानुसार गोंदिया तालुक्यात भाजप १४, काँग्रेस - राष्ट्रवादी ६, अपक्ष १७, तर अर्जुनी मोरगाव तालुक्यात महाविकास आघाडी आणि भाजपला फिफ्टी फिफ्टी जागा मिळाल्या असून, एका ग्रामपंचायतीवर अपक्षांचे वर्चस्व आहे. सालेकसा तालुक्यातील एकूण ९ ग्रामपंचायतींपैकी ६ ग्रामपंचायतींवर भाजप आणि ३ ग्रामपंचायतींवर काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस समर्थीत उमेदवार निवडून आल्याचा दावा पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे. देवरी आणि गाेरेगाव तालुक्यात सर्वच पक्षांनी सर्वाधिक ग्रामपंचायतींवर आपल्या पक्षाची सत्ता आल्याचे दावे - प्रतिदावे केले आहेत. मात्र, याचे नेमके चित्र हे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर हाेऊन ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
......
निकालानंतर सर्वांचाच तो आपलाच नारा
ग्रामपंचायतीची निवडणूक ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढविली जात नाही. या निवडणुका स्थानिक पातळीवर लढविल्या जात असल्याने सर्वच पक्ष हे बाहेरून पाठिंबा देतात. मात्र, सोमवारी ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांनी विजयाचे दावे - प्रतिदावे केले. तसेच निवडून आल्यानंतर तो आपलाच हाच नारा दिसून आला.
.....................
आजी - माजी आमदारांनी राखला गड
ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वच पक्षांच्या आजी - माजी आमदारांनी आपल्या क्षेत्रात वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. गोंदिया विधानसभा क्षेत्रात विद्यमान आमदार विनोद अग्रवाल यांनी १४, तर माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी सुध्दा १४ ग्रामपंचायतींवर वर्चस्व स्थापन केले. त्यामुळे आजी - माजी आमदारांनी गड कायम ठेवल्याचे चित्र होते. सडक अर्जुनी, आमगाव, सालेकसा, देवरी तालुक्यातसुध्दा हेच चित्र होते.
.................
चाचणी झाली आता मुख्य परीक्षेकडे लक्ष
जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचासुध्दा कार्यकाळ पूर्ण झाला असून, त्यासाठीही लवकरच निवडणूक जाहीर होणार आहे. त्यापूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्याने याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागला असून, चाचणी परीक्षा झाली आहे. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
...
निकालानंतर एकच जल्लोष
ग्रामपंचायतीची मतमोजणी तालुकास्तरावर घेण्यात आली. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांनी मतमोजणी केंद्राबाहेर विजयाचा जल्लोष साजरा केला, तर मतमोजणी केंद्राला शुक्रवारी जत्रेचे स्वरूप आले होते.
...........
जातांना प्रफुल्लित मात्र परततांना हिरमुसले
मतमोजणी केंद्राच्या आत केवळ उमेदवारांनाच प्रवेश दिला जात होता. ग्रामपंचायतनिहाय उमेदवारांच्या नावाची घाेषणा झाल्यानंतर ते मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी जात होते. मात्र, निकाल जाहीर झाल्यानंतर कुणाचा विजय, तर कुणाचा पराजय हे निश्चित आहे. त्यामुळे निकालानंतर काही जण प्रफुल्लित काही जण परतताना हिरमुसले दिसून येत होते.