नरेश रहिले
गोंदिया : शिक्षकी पेशात पाय राेवताना त्याची सुरुवात डीएड-बीएडपासून करावी लागते; परंतु शिक्षकांच्या जागा मागील अनेक वर्षांपासून भरण्यात न आल्याने शिक्षक होण्यासाठी लागणारा अभ्यासक्रम डीएड याकडे आता दुर्लक्ष केले जात आहे. आधी ‘मागायची नसेल भीक, तर मास्तरकी शीक’ म्हणून घरची मंडळी मुलांना डीएड करायला भाग पाडत होती; परंतु डीएड करणारे लोक आता गल्लोगल्ली मिळत असल्याने समाजात डीएडची क्रेज कमी झाली आहे. मागील १० वर्षांपासून डीएड शिक्षकांची भरतीच झाली नसल्याने आता डीएडकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली आहे. जिल्ह्यात डीएडचे शिक्षण देणारी १६ अध्यापक विद्यालये आहेत. या विद्यालयांत शासकीय कोटा ७३२, तर व्यवस्थापनाचा कोटा १५८, अशा ८९० जागा जिल्ह्यात आहेत. मात्र, पहिल्या प्रवेशफेरीत १७८ जणांना प्रवेश मिळाला आहे, तर ७१२ जागा अजूनही रिक्तच आहेत.
................
जिल्ह्यातील डीएड कॉलेज- १६
एकूण जागा- ८९०
प्रथम फेरीत प्रवेश- १७८
...............
नोकरीची हमी नाही
-नोकरी करण्यासाठीच डीएडसारख्या अभ्यासक्रमांना विद्यार्थी प्रवेश घेतात; परंतु अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जागाच निघत नाहीत.
- सन २०१२ पासून डीएड केलेल्या लाेकांसाठी जागाच निघाल्या नसल्याने हा अभ्यासक्रम करून काय फायदा, असा समज समाजात निर्माण झाला आहे.
- डीएड झाल्यानंतरही नोकरी मिळेल याची काही शाश्वती नसल्याने विद्यार्थ्यांनी डीएडकडे पाठ फिरविली आहे.
...................
म्हणून इतर अभ्यासक्रमांना प्रवेश
१) मागील १०-१२ वर्षापासून डीएड केलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण सेवक म्हणून नोकरी देण्यासाठी जागाच काढण्यात आल्या नाहीत. त्यामुळे समाजात असलेली डीएडची क्रेज कमी झाली आहे. परिणामी, मी डीएडला ॲडमिशन घेतले नाही व त्याऐवजी दुसरा अभ्यासक्रम निवडला.
-राहुल दोनोडे, साखरीटोला
.........
२) पदविका घेऊनही ती नोकरीच्या कामात येत नसेल, तर तो अभ्यासक्रम कशाला करायचा. ज्याच्यातून आपल्याला रोजगार शोधता येईल त्या अभ्यासक्रमाची आपण निवड केली. म्हणूनच डीएडचा विचार मागे सारून दुसरीकडे वळले.
-भारती खोटेले, आदर्श काेहळीटोला
.........................
कोट
डीएडच्या प्रवेशाकरिता यंदा पहिली फेरी झाली. या पहिल्या फेरीत जिल्ह्यातील ८९० जागांपैकी १७८ जागांवर प्रवेश घेण्यात आले. दुसरी फेरी आजपासून (दि.११) पासून सुरू होत आहे. आधीच्या तुलनेत आता डीएडमध्ये प्रवेश घेण्यासाठी तेवढी चढाओढ नाही.
-नंदेश्वर कथलेवार, प्राचार्य, श्री लक्ष्मणराव मानकर कॉलेज ऑफ एज्युकेशन, आमगाव