१९ मे, २०१९ रोजी येथील कविता (बदललेले नाव) सोबत गोंदिया येथील रहिवासी अभियंता खेमेंद्र बिसेन याचे लग्न झाले होते. लग्नात वधू पित्यासह नातलगांनी आवश्यक भेट वस्तू दिल्या. खेमेंद्र हैदराबाद येथे नोकरी करीत असताना, मुलीने पतीसोबत हैदराबादला राहण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु सासरच्या मंडळींनी हैदराबाद येथे राहण्यासाठी लागणारे जीवनावश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी माहेरून रक्कम घेऊन ये, अशी अट घातली. ही बाब मुलीच्या वडिलांना कळताच, त्यांनी जावयाच्या बँक खात्यात एक लाख ५६ हजार रुपये पाठविले, परंतु सासरच्या मंडळींचे समाधान झाले नाही. यावर सुनेच्या अंगावरील दागिने मागून आपल्यासाठी माहेरून दागिने आण, अशी मागणी केली.
शारीरिक छळ केला, याची तक्रार मुलीने आपल्या माहेरी केली असता, त्यांनी गोंदिया येथे भरोसा सेलमध्ये तक्रार केली. भरोसा सेलने समझोता करून दिला व मुलगी सासरी पाठविण्यात आली, परंतु त्यानंतरही सासरच्या मंडळींनी सुनेवर अत्याचार करणे थांबविले नाही. प्रकरणी पती खेमेंद्र बिसेन यासह कुटुंबातील सुषमा रहांगडाले, उषा बिसेन, भूपेंद्र बिसेन, अर्पिता रहांगडाले यांच्या विरुद्ध भादंवि कलम ४९८ (अ), ३४ अन्वये हुंडा मागणी व शारीरिक मानसिक छळ केला. याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद बघेले प्रकरणाचा तपास करीत आहेत.