रावणवाडी : अन्न व औषध प्रशासन विभाग पूर्वी सुगंधित तंबाखू विक्रेत्यांची वेळोवेळी तपासणी करीत असत. मात्र आता या विक्रेत्यांवर कुणाचेच नियंत्रण नसल्यामुळे सुगंधित बनावटी तंबाखूपासून खर्ऱ्याच्या विक्रीला उधान आले आहे. ग्रामीण भागात सर्रास दिसत असलेल्या या चित्रामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.सुगंधित तंबाखू विक्री व उपयोगावर बंदी घालण्यात आली तेव्हापासून पान खर्राधारकांनी सुगंधित तंबाखूचा खर्रा उघडपणे विक्री करणे बंद केले होते. मात्र आता तंबाखू विक्रेत्यांची नियमित तपासणी होत नसल्यामुळे बनावट सुगंधित तंबाखूच्या खर्ऱ्याची विक्री जोमाने होत आहे. मागील काळात सुगंधित तंबाखूच्या थोक व्यापाऱ्यांवर कारवाई केली होती, म्हणून व्यापारी सुगंधित तंबाखू चोरी छुप्या मार्गाने विक्री करीत असत. मात्र आता या व्यवसायाकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे सुगंधित बनावट तंबाखू खर्ऱ्यासाठी बाजारात सहज उपलब्ध होत आहे. खर्रा शौकीनांच्या संख्येत झालेल्या लक्षणीय वाढीमुळे खर्राच्या विक्रीलाही वेग आला आहे. मात्र खर्रासाठी वापरण्यात येणाऱ्या सुगंधित तंबाखूचे घातक परिणाम शौकीनाच्या आरोग्यावर होत आहे. खर्ऱ्यासाठी महागडा ब्रँन्डेड तंबाखू खरेदी करणे पानटपरीधारकांना शक्य होत नसल्याने आणि जास्तीचा नफा कमविण्याचा बेताने पानटपरीधारक बनावटी सुगंधित तंबाखू वापरूनच खर्रा बनवित आहेत. या तंबाखूच्या सेवनामुळे डोके दुखने, गळ्यात गाठी येणे, वेळोवेळी चक्कर आल्यासारखे वाटणे असे अनेक दुष्परिणाम खर्रा शौकीनांना जाणवू लागले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अन्न व औषध प्रशासनाने या प्रकाराची वेळीच दखल घेऊन तपासणी अभियान राबवून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)
भेसळयुक्त तंबाखूमुळे खर्रा शौकिनाचे आरोग्य धोक्यात
By admin | Published: September 14, 2014 12:00 AM