पावसाअभावी दीड लाख हेक्टरवरील रोवण्या खोळंबल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:19 AM2021-07-19T04:19:40+5:302021-07-19T04:19:40+5:30
गोंदिया : जुलै महिना संपत आला तरी अद्यापही पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील दीड लाख हेक्टरवरील ...
गोंदिया : जुलै महिना संपत आला तरी अद्यापही पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील दीड लाख हेक्टरवरील रोवण्या खोळंबल्या आहेत. तर हवामान विभागाचे अंदाज यंदा वांरवार खोटे ठरत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात १ लाख ८१ हजार हेक्टरवर धान पिकाच्या लागवडीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. जिल्ह्यात अधूनमधून पाऊस हजेरी लावत आहे. मात्र रोवणीयोग्य पाऊस न झाल्याने आतापर्यंत केवळ २० टक्के रोवण्या झाल्या आहेत. तर ८० टक्के रोवण्या होणे अद्यापही शिल्लक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या एकूण २९.८ टक्के पाऊस झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३६३.७ मीमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र सलग पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील नदी-नाले अद्यापही कोरडे पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या काळजीत अधिक भर पडली आहे. हवामान विभागाने यंदा १०० टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र हा अंदाज सुरुवातीपासूनच चुकत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. आकाशात दररोज मेघ भरून येतात. मात्र पाऊस हजेरी लावत नसल्याने वातावरणात उकाडा वाढला आहे. त्यामुळे जिल्हावासीय उकाड्याने तर शेतकरी पावसाअभावी चिंतातुर झाल्याचे चित्र आहे.
............
आठ दिवसात पाऊस न झाल्यास स्थिती गंभीर
ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे त्या शेतकऱ्यांनी रोवणी सुरू केली आहे. मात्र जे शेतकरी वरथेंबी पावसावरच अवलंबून आहेत त्यांची पावसाअभावी मोठी अडचण झाली आहे. जिल्ह्यात आठ दिवसात पाऊस न झाल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.