कपिल केकत
गोंदिया : सध्या भारतीयांना भारतीय खाद्य पदार्थांपेक्षा चायनीज पदार्थांचा भारी चस्का लागला असून, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच आवड चायनीज फूड झाले आहे. हेच कारण आहे की, आजची तरूणाई चाटच्या ठेल्यांवर कमी व चायनीज ठेल्यांवर जास्त प्रमाणात उभी दिसते. हॉटेल्समध्येही भारतीय खाद्य पदार्थांची ऑर्डर सोडून चायनीज फूड्स मागविले जाते. मात्र, या चायनीज फूडमध्ये पदार्थ जास्त चविष्ट व्हावे, यासाठी चायनीज सॉल्टचा वापर केला जातो. या चायनीज सॉल्टलाच अजिनोमोटो व मोनो सोडियम ग्लूटामिट असे म्हटले जाते. पदार्थाची चव वाढविण्यासाठी वापरात येत असलेल्या अजिनोमोटोचा १ किलो पदार्थात १० ग्रामपेक्षाही कमी वापर एवढी मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. कारण अजिनोमोटोचे अधिक प्रमाणात सेवन करणे हे आरोग्यासाठी धोक्याचे आहे. अजिनोमोटोचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने एकतर मोटापा वाढतो. शिवाय, डोकेदुखी, अंगदुखी, हातापायांना झुनझुनी, घाम येणे, छातीत जळजळ, रक्तदाब वाढणे यांसारख्या समस्या उद्भवतात. फूड पॉईझनिंगचे प्रमाण जास्त असते. असे झाल्यास खूप पाणी प्यावे. जेणेकरून अजिनोमोटाे आपल्या शरीरात विरघळेल व निघून जाईल.
--------------------------------
काय आहे अजिनोमोटो ?
अजिनोमोटो म्हणजे चायनीज सॉल्ट असून, यालाच मोनो सोडियम ग्लुटामिट असेही म्हटले जाते. अजिनोमोटो हा चायनीज पदार्थांची चव वाढविण्यासाठी वापरला जातो व त्याची एक ठराविक मात्रा आहे. मात्र, जास्त प्रमाणात वापर होत असल्यास आरोग्यासाठी धोकादायक आहे.
---------------------------
म्हणून चायनीज खाणे टाळा
कोणत्याही पदार्थाचा अति वापर हा धोक्याचा असतो. चायनीज पदार्थांमध्ये चव वाढविण्यासाठी अजिनोमोटोचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. यामुळे एकतर फूड पॉईझनिंग होते. त्यानंतर अन्य आजार जडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळेच चायनीज पदार्थांपेक्षा आपले भारतीय पदार्थ खाणे केव्हाही चांगले आहे.
---------------------------
ताजे पदार्थ खा...
कोणत्याही पदार्थाचा अतिवापर आरोग्यासाठी हानिकारक असतो. चायनीज पदार्थात अजिनोमोटोचा वापर होतोच. यामुळे चायनीज फूडपेक्षा आपले भारतीय ताजे तयार केलेले पदार्थ खावेत. भारतीय खाद्य पदार्थ शुध्द सात्विक असतात. त्यात अजिनोमोटोसारख्या पदार्थांचा वापर होत नाही.
- डॉ. विकास जैन
वरिष्ठ सर्जन, गोंदिया.