वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 09:04 PM2019-05-09T21:04:55+5:302019-05-09T21:05:28+5:30
शहरातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायीकांनी अतिक्रमण केले असल्याने रस्ते अरुंद झाले असून दर तासाला वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र शहरातील मुख्य चौकात पाहायला मिळते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायीकांनी अतिक्रमण केले असल्याने रस्ते अरुंद झाले असून दर तासाला वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र शहरातील मुख्य चौकात पाहायला मिळते. यावर शहरवासीयांची ओरड वाढल्यानंतर वाहतूक नियंत्रण विभागाने नगर परिषदेसह शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी शुक्रवारपासून (दि.१०) शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरातील रेल्वे स्थानक, गोरेलाल चौक, नेहरु चौक, गांधी प्रतिमा, चांदणी चौक, दुर्गा चौक या परिसरात मुख्य बाजारपेठ असल्याने नागरिकांची दिवसभर वर्दळ असते. मात्र या रस्त्याच्या दोन्हीे बाजुला मोठ्या व्यावसायीकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रस्त्यांची रुंदी कमी झालीे आहे. एखादे चारचाकी वाहन आल्यास संपूर्ण रस्ताच बंद होतो. दिवाळी व इतर सण उत्सवाच्या कालावधीत या रस्त्यावरुन पायी जाणे सुध्दा कठिण होते.यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते. यावर मार्ग काढण्यासाठी वाहतूक नियंत्रण विभागाने वन वे पार्कींगचा प्रयोग राबविला. मात्र त्यात सातत्य ठेवण्यात या विभागाला अपयश आले. विशेष म्हणजे शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक शिपायांची नियुक्ती केली. मात्र याचाही काहीच उपयोग झाला नाही.त्यामुळे पुन्हा एकदा वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक नियंत्रण विभागाने शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहीमेची सुरूवात शुक्रवारपासून केली जाणार आहे. या मोहीमेदरम्यान छोट्या व्यावसायिकांना लक्ष केले जाते की सर्वांवरच कारवाई केली जाते याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.