संतोष बुकावन
लोकमत न्युज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : बोगस विद्यार्थी भरतीचे प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर ‘ त्या’ शाळेची पटसंख्या आता कमी झाली आहे. २२९वरून ही पटसंख्या ७८पर्यंत खाली आली आहे. यानंतर ‘त्या’ शाळेवर आता काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.
येथे सावित्रीबाई शिशु मंदिर उच्च प्राथमिक शाळा आहे. ही शाळा स्वयं अर्थसहाय्यित असून, येथे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध आहे. प्रकरण चव्हाट्यावर येण्यापूर्वी शाळेची पटसंख्या २२९ होती. विशेष उल्लेखनीय म्हणजे, या शाळेत पहिल्या वर्गात ६२ विद्यार्थी दाखल होते. नामांकित शाळेतही एवढी पटसंख्या राहत नाही, मग या शाळेत कशी हा संशोधनाचा विषय होता. ‘लोकमत’ने हे प्रकरण सर्वप्रथम उजेडात आणले. या प्रकरणाला वाचा फुटताच निद्रावस्थेत असलेले शिक्षण विभाग खळबळून जागे होऊन चौकशी झाली. चौकशीत अनेक तथ्य आढळून आले. अनेक पालकांना आपल्या पाल्याचा शाळेत प्रवेश झाला आहे याची यत्किंचितही कल्पना नव्हती.
वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या एका पालकाच्या मुलाचे नाव या शाळेत दाखल होते. ते जेव्हा दुसऱ्या शाळेत मुलाचे नाव दाखल करण्यासाठी गेले तेव्हा त्यांना ही बाब कळली. विद्यार्थ्यांची स्टुडंट आयडी तयार झाली होती. त्यांच्या मुलाचे नाव या शाळेच्या पोर्टलवर असल्याचे दिसून आले. त्यांनी कुठलेही दस्तावेज दिले नसतानाही हे ऐकून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी शाळा व्यवस्थापनाला चांगलेच खडे बोल सुनावले. अखेर शाळेने ते नाव कमी केले सध्या तो मुलगा शाळाबाह्य आहे. त्याच्या प्रवेशाचा तिढा अद्यापही कायम असल्याचे समजते.
या सर्व प्रक्रियेत शासकीय अनुदान लाटणारे मोठे रॅकेट असावे अशी शंका व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागातील काही कर्मचारी यात गुंतले असण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. या शाळेला आजतागायत अनुदानाचा लाभ देण्यात आला का ? याची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
लोकमतचे वृत्त खरे ठरले !
गटशिक्षणाधिकारी मांढरे यांनी शाळेला भेट दिली व विद्यार्थ्यांच्या हजेरीपट व स्टुडंट पोर्टलची तपासणी केली. कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता वर्ग १ ते ७चे विद्यार्थी शाळेत येणे बंद आहे. वर्ग ८ची तपासणी केली असता पटावर १७ विद्यार्थी आहेत. मात्र शाळेत केवळ तीन विद्यार्थी दिसून आले. हे तीन विद्यार्थी व दोन विद्यार्थी आणखी असे एकूण पाच विद्यार्थी ग्राह्य धरण्यात आले. उर्वरित विद्यार्थ्यांची नावे हजेरीपट तसेच पोर्टलवरून कमी करण्याचे मुख्याध्यापकांना निर्देश दिले. शिवाय, इतर वर्गातील संशयित नावे कमी करण्याचे निर्देश दिले. आता सुमारे १५० विद्यार्थी कमी झाले असून, केवळ ७६ विद्यार्थी उरले आहेत. अद्यापही इतर शाळांत दाखल असलेल्या विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अपडेट होत नसून ही नावे या शाळेच्या पोर्टलवर असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे आणखी विद्यार्थी संख्या कमी होण्याची शक्यता आहे. हे प्रकरण चव्हाट्यावर आणल्याने अनेकांनी ‘लोकमत’चे कौतुक केले आहे.
आता बिंग फुटणार
सरल प्रणालींतर्गत स्टुडंट पोर्टलमध्ये विद्यार्थ्याच्या आधार क्रमांकाची माहिती २९ सप्टेंबरपूर्वी नोंद करणे तसेच यापूर्वी नोंदविण्यात आलेल्या माहितीची पडताळणी करण्याबाबत शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी १३ सप्टेंबर रोजी पत्र काढले. यामुळे बोगस विद्यार्थी पटसंख्येचे बिंग फुटणार आहे. यात आणखी शाळा आहेत का ? ते बघणे इष्ट ठरेल.