एस्कलेटर व रॅम्पचे काम प्रलंबित
By admin | Published: April 21, 2015 12:40 AM2015-04-21T00:40:43+5:302015-04-21T00:40:43+5:30
वृद्ध व अपंगांना एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर ये-जा करण्यासाठी गोंदिया रेल्वे स्थानकावर एस्कलेटर व रॅम्पची सोय करण्यात येणार होती.
गोंदिया रेल्वेस्थानक : वृद्ध व अपंगांची गैरसोय
गोंदिया : वृद्ध व अपंगांना एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर ये-जा करण्यासाठी गोंदिया रेल्वे स्थानकावर एस्कलेटर व रॅम्पची सोय करण्यात येणार होती. तसे प्रस्तावसुद्धा मंजूर करण्यात आले. मात्र माशी कुठे शिंकली कोण जाणे, आता या सुविधेपासून गोंदिया रेल्वे स्थानक वंचित ठरत आहे.
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक तन्मय मुखोपाध्याय यांनी एप्रिल किंवा मे महिन्यापासून एस्कलेटर व रॅम्पची सुविधा गोंदिया स्थानकात सुरू होणार, असे डिसेंबर २०१४ मध्येच सांगितले होते. मात्र एप्रिल महिना लोटत असतानाही या संबंधात कसल्याही कामाचा शुभारंभ करण्यात आला नाही. आता ड्रार्इंगमध्ये काहीतरी चुका असल्याचे सांगून हे कामच प्रलंबित ठेवण्यात आल्याचे गोंदिया स्थानक व्यवस्थापक कार यांनी सांगितले. जोपर्यंत ड्रार्इंगमधील चुका दुरूस्त करण्यात येणार नाहीत, तोपर्यंत गोंदिया स्थानकावर एस्कलेटर व रॅम्पच्या कामाचा शुभारंभ होवू शकणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकाराने वृद्ध व अपंग प्रवाशांना एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर ये-जा करण्यासाठी कमालीची कसरत करावी लागत आहे.
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मार्गावरील गोंदिया स्थानक एक महत्वपूर्ण स्थानक आहे. दररोज जवळपास २० हजार प्रवाशी येथून आपला प्रवास करतात, तर एवढेच प्रवाशी या स्थानकावर उतरतात. शिवाय या रेल्वेमार्गावरील सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे गोंदिया स्थानक आहे. परंतु एस्कलेटर व रॅम्पची सोय करून देण्याकडे वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. (प्रतिनिधी)