कबुतराचीच प्रजात : ‘महाराष्ट्र पक्षी’ म्हणून मान्यता संतोष बुकावन अर्जुनी मोरगावभारतात कबुतर या पक्ष्याच्या अनेक जाती आहेत. यात हरितालक नावाची एक जात आहे. त्या जातीचे पक्षी दिसण्यास अत्यंत सुंदर असून ते ‘महाराष्ट्र पक्षी’ म्हणून ओळखले जातात. घनदाट जंगलात दृष्टीस पडणारा हरितालक पक्षी तिडका/करडगावच्या जंगलात सध्या दृष्टीस पडत आल्याची माहिती पक्षीमित्र प्रा.अजय राऊत यांनी दिली.भारतातील कबुतरांच्या जातींपैकी हरितालक (कॉमन ग्रीन पिजन) ही एक जात आहे. या पक्ष्याचा रंग पिवळा, आॅलीव्ही हिरवा किंवा करडा असतो. यात नराच्या खांद्यावर फिकट जांभळया रंगाचा डाग, काळपट पंखावर पिवळ्या रंगाचा पट्टा स्पष्टपणे दिसतो. हरितालकचे पाय इतर जातींच्या कबुतरांपेक्षा संपूर्णत: वेगळे म्हणजेच पिवळ्या रंगाचे असतात. त्यामुळे पिवळ्या पायांचा कबुतर असेही त्याला संबोधले जाते. या पक्ष्याच्या हिरव्या-पोपटी रंगामुळे याला हरीयल या नावाने ओळखतात. वड, पिंपळ, उंबर व अंजिर या झाडांवरील या फळ या पक्ष्यांचे आवडते खाद्य आहे. हे पक्षी साधारणपणे घनदाट जंगलात थव्याने राहणे अधिक पसंत करतात. हे पक्षी झाडांवर बसलेले असले तरी त्यांचे अस्तित्व जाणवत नाही. कारण त्यांच्या पायांचा रंग व झाडांच्या पानांचा रंग जवळजवळ सारखाच असतो. आकर्षक शरीरयष्टीच्या देखाव्यामुळेच याला महाराष्ट्र पक्षी अशी मान्यता मिळाली आहे. हल्ली पक्ष्यांच्या शिकारीचे प्रमाण वाढले असून ग्रामीण भागात या पक्ष्याचे मांस मोठ्या आवडीने खाल्ले जाते. हा पक्षी बहूधा कळपात (समुहात) राहतो. त्यांचा बहूतांश दिवस हा फळे गोळा करण्यातच जातो. फक्त मधूनमधून झाडाच्या उंच टोकांवरील फांद्यावर बसून ते मधून- मधून विश्रांती घेतात. पर्ण विरहित झाडांच्या टोकांच्या फांद्यावर सकाळी व संध्याकाळी पंख पसरवून सुर्य स्नान करताना हे पक्षी दिसतात. या पक्ष्यांचा शिटीचा आवाज मृदू व मंजूळ असून खालच्या सुरापासून वरच्या सुरापर्यंत तो फिरतो. त्या आवाजाला मानवी छटा असते. यांचे घरटे कबूतराप्रमाणेच काटक्यांचे रचलेले असते. वृक्षांच्या गर्द पर्णराजीत ही घरटी लपलेली असतात. इतर पक्ष्यांच्या नियमानुसार हरितालक नेहमीच न चुकता दोन अंडी घालतो. महाराष्ट्र राज्याच्या या राज्य पक्ष्यांचा घरटे विणीचा हंगाम मार्च ते जून ही असतो. (तालुका प्रतिनिधी)
तिडकाच्या जंगलात दिसला हरितालक
By admin | Published: April 21, 2015 12:39 AM