लोकमत न्यूज नेटवर्कसुकडी-डाकराम : धापेवाडा उपसा सिंचन विभाग टप्पा-२ अंतर्गत बोदलकसा जलाशयात पाणी टाकण्यासाठी पाईपलाईनच्या खोदकामाला अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि.१८) पोलीस बंदोबस्तात सुरुवात केली. जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र असल्याचे सांगत कामाला सुरुवात करण्यात आली असून, पत्राची फक्त अफवाच असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे मात्र पाईपलाईनसाठी मोहरीच्या उभ्या पिकातून खोदकाम केले जात आहे. असे असतानाही शेतकऱ्यांच्या मदतीला कोणताही नेता धावून आला नाही. शुक्रवारी (दि.१८) धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे अधिकारी पोलीस बंदोबस्तात गावात धडकले व त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र असल्याचे सांगत शेतातून पाईपलाईनसाठी खोदकामाला सुरुवात केली. यावर गावकरी व शेतकऱ्यांनी विरोध केला. एवढेच नव्हे तर माजी आमदार दिलीप बंसोड यांनीही शेतकऱ्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. पण संबंधित अभियंत्यांनी काहीच ऐकून न घेता खोदकामाला सुरुवात केली. जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र असल्याचे अधिकारी सांगत असतानाच जिल्हाधिकारी कार्यालयातून असे कोणतेच पत्र संबंधित विभागाला आले नसून, फक्त ती अफवा होती, असे दिसत आहे. शेतातून खोदकामासाठी शेतकऱ्यांचा विरोध असल्याने उपविभागीय अधिकारीसुद्धा सुकडी-डाकराम येथे येऊन मोकापाहणी करून गेले होते. हे प्रकरण उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयात असतानाच संधीचा फायदा घेऊन धापेवाडा उपसा सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र असल्याचे सांगून शेतातून खोदकाम सुरू केले. यानंतर शुक्रवारी येथे पोलीस उपविभागीय अधिकारी प्रमोद मडामे व पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांच्यासह १०० च्यावर पोलीस कर्मचारी होते. यातूनच रात्रीलासुद्धा पोलीस बंदोबस्तात पाईपलाईनचे खोदकाम सुरू होते.
शेतकऱ्यांच्या मदतीला कुणीही फिरकला नाही
- या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना समस्यांचे निराकरण करण्यासाठी फक्त माजी आमदार दिलीप बन्सोड आले होते. त्यानंतर जिल्ह्यातील कुणीच आमदार, खासदार, मंत्री व नेता फिरकलाच नाही. या शेतकऱ्यांना नेत्यांनी वाऱ्यावर सोडले आहे. पाईपलाईनचे खोदकाम मोहरीच्या उभ्या पिकावर सुरू असून अधिकाऱ्यांनी उभ्या पिकांचीही गय केली नाही. अधिकाऱ्यांची जबान बदलली- धापेवाडा उपसा सिंचनचे कार्यकारी अभियंता अंकुर कापसे यांना विचारले शुक्रवारी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र आहे असे शेतकऱ्यांना सांगितले होते. पण कापसे यांना शनिवारी विचारले असता त्यांनी, हे आमच्या विभागाचे काम आहे येथे जिल्हाधिकारी कार्यालयाचा कुठेच संबंध येत नाही व तसे पत्रसुद्धा नाही. फक्त पोलीस प्रशासनाचे पत्र असल्याचे सांगितले. एकंदर जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राचा धाक दाखवून खोदकामाला सुरुवात करण्यात आली असल्याचे दिसून येत आहे.