अनुदानावरील बियाणांसाठी अर्जाला मुदतवाढ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:29 AM2021-05-13T04:29:23+5:302021-05-13T04:29:23+5:30
तिरोडा : शेतकऱ्यांना खरीप हंगामाकरिता अनुदानावरील बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांकडून १५ मे पर्यंत ऑनलाइन अर्ज मागविले ...
तिरोडा : शेतकऱ्यांना खरीप हंगामाकरिता अनुदानावरील बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांकडून १५ मे पर्यंत ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. मात्र, सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने ऑनलाइन अर्ज करण्यास शेतकऱ्यांना अडचण आहे. त्यामुळे शासनाने लॉकडाऊन संपेपर्यंत अर्ज करण्याची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी माजी आ. दिलीप बन्सोड यांनी केली आहे.
राज्य सरकारने शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी अनुदानावर बियाणे उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे; परंतु थेट कृषी केंद्रावरून बियाणे खरेदी करताना सातबारावर बियाणे मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांना डीबीटी पोर्टलवर १५ मे पर्यंत अर्ज करावे लागणार आहेत. मात्र, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन आहे. तलाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या कामात व्यस्त आहे, तर बरेच तलाठी कोरोनाबाधित आहेत. लॉकडाऊनमुळे ऑनलाइन सेंटरदेखील बंद असल्याने शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याची समस्या आहे, तर बऱ्याच भागांत कोरोनामुळे कंटेन्मेंट झोन असल्याने शेतकऱ्यांना बाहेर पडण्यास अडचण येत आहे. पालकमंत्र्यांना या सर्व गोष्टींची कल्पना असतानासुद्धा त्यांनी याबाबत कुठलेच पाऊल उचलले नाही, हे दुर्दैवी असल्याचा आरोप माजी आ. दिलीप बन्सोड यांनी केला आहे. कृषी विभागाने अनुदानावरील बियाणांसाठी १५ मे पर्यंत मुदत दिली असल्याने तीन दिवसांत शेतकरी ऑनलाइन अर्ज कसे करणार, असा प्रश्न आहे. त्यामुळे बरेच शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने अनुदानावरील बियाणांसाठी अर्ज करण्याची मुदत लॉकडाऊनपर्यंत वाढवून द्यावी, अशी मागणी माजी आ. दिलीप बन्सोड यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.