चार लाखांच्या मदतीचा मेसेज बनावट; आलेल्या अर्जाचे करायचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:01 AM2021-09-02T05:01:56+5:302021-09-02T05:01:56+5:30
गोंदिया : कोविड-१९ ने मृत्यू पावलेल्या लोकांना शासन ४ लाखांची मदत करत असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...
गोंदिया : कोविड-१९ ने मृत्यू पावलेल्या लोकांना शासन ४ लाखांची मदत करत असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोरोनामुळे आपल्या कुटुंबातील व्यक्ती गेला त्यामुळे या व्हायरल मॅसेजमुळे लोक अर्ज करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. शासनाने काेविडने मृत्यू झालेल्या सामान्य माणसांना कसलीही मदत जाहीर केली नाही. त्यामुळे ह्या बनावट मेसेजचा त्रास जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय व आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाला होत आहे. आपल्या कुटुंबातील व्यक्ती कोरोनामुळे आम्ही गमावला त्यामुळे शासन आम्हाला मदत म्हणून चार लाख रुपये देत असल्याची खोटी वार्ता सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात पसरली. अर्ज कसे करावेत यासंदर्भात त्यात माहिती व अर्जाचा नमुना आहे. शासनाने अशी कुठलीही योजना सुरू केली नाही. त्यामुळे बनावट मेसेजच्या नादात लोकांनी पडू नये. या बनावट मेसेजच्या नादात पडून माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात लोक येत आहेत.
...............
आपत्ती व्यवस्थापनाकडे केली ५०० लोकांनी विचारणा
या बनावट मेसेजला पाहून जिल्ह्यातील कोविडमुळे मृत झालेल्या लोकांच्या कुटुंबातील लोक चार लाख रुपये शासन देत आहे का? यासाठी अर्ज कसे करावे ही माहिती घेण्यासाठी जवळजवळ ५०० लोकांनी यासंदर्भात विचारणा केल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी सांगितले. शासनाची अशी योजना नाही, असे सांगून येणाऱ्यांना परत पाठविण्यात आले.
..............
या अर्जाचे काय करणार?
अनेक लाेकांनी त्या मेसेजमधील अर्जाचा नमुना दिला आहे. त्या अर्जाच्या नमुन्याची झेरॉक्स काढून त्यात माहिती भरून लोक तो अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात आणून देत आहेत. शासनाची योजनाच नसल्याने या अर्जांना कचऱ्याच्या टोपलीत टाकले जाणार आहे.
............
काय आहे बनावट मॅसेज?
बनावट मॅसेजमध्ये कोविडने मृत पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना ४ लाखाची मदत शासन देणार आहे. त्यासाठी मृतकची पत्नी, मुलगा, मुलगी यांच्या नावाने अर्ज करावे, मृतकाचे नाव, मृत्यूची तारीख, पूर्ण पत्ता, मृतकाचा आधारक्रमांक, मृतकाचे अर्जदाराशी असलेले नातेसंबंध, मृत्यू प्रमाणपत्र, मृताचा रुग्णालयाचा दाखला व खाते क्रमांक नमूद करण्याच्या सूचना त्या ोसेजमध्ये आहेत.
...........
अर्ज करू नका अशी कुठलीही योजना नाही!
कोविडने मृत झालेल्या सर्वसामान्य लोकांना मदत म्हणून चार लाख रुपये देण्यात येतील, अशी शासनाची कुठलीही योजना नाही. योजनाच नाही तर अर्ज करणे चुकीचे आहे. खोट्या मेसेजच्या आधारावर अर्ज करणे योग्य नाही.
- नयना गुंडे, जिल्हाधिकारी गोंदिया.
.....