कुऱ्हाडी : राज्य शासनाच्या वतीने गोरेगाव तालुक्यातील कुऱ्हाडी गावात शहीद जान्या-तिम्या स्मारकाचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र त्यानंतर देखभालीअभावी सदर स्मारक दुरवस्थेत आहे. शासनाच्या वतीने सदर स्मारकाचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.शासनाने निर्मित केलेली शहीद जान्या-तिम्या ही एक उत्कृष्ट वास्तू असून गावकऱ्यांसाठी अभिमानाची बाब आहे. परंतु या वास्तूची देखरेख होत नसल्यामुळे ही वास्तूच आपल्या दुर्दैवावर रडत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाचेही याकडे दुर्लक्ष आहे. ना. प्रफुल्लभाई पटेल यांनी दुरूस्तीसाठी दोन लाखांचा निधी दिला होता. त्यातून दुरूस्तीसुद्धा झाली. मात्र कंत्राटदाराने झाड कापताना स्मारकाचा एक भागच तोडला. तो वर्षभराचा कालावधी लोटूनही दुरूस्त करण्यात आलेला नाही. ना. पटेलांनी आवारभिंतीसाठीसुद्धा निधी दिला होता. परंतु ही आवारभिंत केवळ दोन बाजूंनी तयार करण्यात आली. उर्वरित दोन्ही बाजू तशाच उघड्या अवस्थेत पडून आहेत. त्यामुळे मोकाट जनावरांचा येथे शिरकाव होत असून शहीद स्मारकाचे परिसर घाणेरडे झाले आहे. गावात विविध विकासात्मक बदल घडवून आणणाऱ्या कमिट्या आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाने जर एखाद्या कमिटीवर शहीद स्मारकात रखरखाव ठेवण्याची जबाबदारी सोपविली, तर स्मारकाचे सौंदर्यीकरण होण्यास वाव मिळू शकते. कुऱ्हाडी ग्रामपंचायतने ही जबाबदारी स्वीकारावी, अशी येथील गावकऱ्यांची मागणी आहे. (वार्ताहर)
जान्या-तिम्या स्मारकाची दुरवस्था
By admin | Published: January 03, 2015 1:30 AM