विलिनीकरणात अडकला शेतकऱ्यांचा सन्मान निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:33 AM2021-09-15T04:33:41+5:302021-09-15T04:33:41+5:30
नवेगावबांध : देना बँकेचे बँक ऑफ बडोदामध्ये मागील दोन वर्षांपूर्वी विलिनीकरण झाले. त्यामुळे खातेदारांचे खाते नंबर बदलले आहेत. परिणामी ...
नवेगावबांध : देना बँकेचे बँक ऑफ बडोदामध्ये मागील दोन वर्षांपूर्वी विलिनीकरण झाले. त्यामुळे खातेदारांचे खाते नंबर बदलले आहेत. परिणामी गेल्या आठ - नऊ महिन्यांपासून पंतप्रधान किसान सन्मान निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही. लाभार्थी खातेदारांचा नवीन खाते नंबर लिंक करण्याच्या कामात अर्जुनी मोरगाव येथील तहसील कार्यालयातून विलंब होत आहे. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असून, बँका आणि तहसील कार्यालयात शेतकऱ्यांची पायपीट सुरु आहे.
नोव्हेंबर २०२०मध्ये पूर्वाश्रमीच्या देना बँकेच्या खातेदारांचे खाते नंबर व आयएफएससी कोडमध्ये बदल झाला आहे. त्यामुळे खाते नंबर चुकीचा आहे, असे मेसेज येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी नवीन खाते लिंक करण्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज दिला आहे. परंतु नवीन खाते लिंक करण्याचे काम सध्या संथ गतीने सुरू असल्याने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीच्या लाभार्थी शेतकऱ्यांना गेल्या वर्षीपासून तीन हप्त्यात मिळणारा दोन हजार रुपये शेतकरी सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात झाला नाही. परिणामी अनेक वृद्ध शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. बँक ऑफ बडोदामध्ये खाते असणाऱ्या शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात अर्ज भरून किंवा लेखी अर्जाद्वारे आपले नवीन खाते नंबर व बदललेला आयएफएससी कोड यात बदल करण्यात यावा, नवीन खाते नंबर जोडण्यात यावे, यासाठी गेल्या आठ - नऊ महिन्यांपासून शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय, अर्जुनी मोरगाव येथे अर्ज केले आहे. परंतु तहसील कार्यालयाच्या दप्तर दिरंगाईमुळे अनेक वृद्ध शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्यापासून वंचित आहेत.
.............
हे आमचे काम नाही
हे आमचे नाही. परंतु आता करावे लागत आहे. कार्यालयाची कामेही करावी लागतात. त्यामुळे या कामाला वेळ लागत आहे. आम्ही नवीन कॉम्प्युटर ऑपरेटर या ठिकाणी कामाला लावू शकत नाही, असे उत्तर संबंधित लिपिकाकडून शेतकऱ्यांना दिले जाते, अशी माहिती काही शेतकऱ्यांनी दिली आहे.
...........
आम्ही कुठवर वाट पाहायची?
निधीअभावी वृद्ध लाभार्थ्यांची आर्थिक अडचण होत आहे. सध्या धान पिकांवर विविध रोगांचे आक्रमण झाले आहे. त्यात खते, औषधी यावर भरपूर खर्च होत आहे. परंतु शेतकरी सन्मान निधी जमा न झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तहसील कार्यालयाने शेतकरी सन्मान निधीच्या लाभार्थ्यांचे नवीन खाती लिंक करण्याची मागणी केली आहे.