अर्जुनी मोरगाव (गोंदिया) : शेताभोवती लावलेल्या जिवंत विद्युत तारांना स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्यामुळे बापलेकांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. २१) रात्री १० वाजतादरम्यान मोरगाव येथील शेतशिवारात घडली. वामन दुधराम हातझाडे (५०) व संतोष वामन हातझाडे (२४) अशी मृत बापलेकांची नावे आहेत. शुक्रवारी अत्यंत शोकाकुल वातावरणात बापलेकांच्या पार्थिवांवर मोरगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
मोरगाव येथील ईश्वरदास मनोहर पर्वते (४७) यांची मृतांच्या घराशेजारी शेती आहे. या शेतात शेतमालक ईश्वरदास यांनी मका पिकाची लागवड केली आहे. त्यांनी स्वतःच्या राहत्या घरातून विद्युत केबल टाकून मका पीक असलेल्या शेताभोवती लावलेल्या विद्युत तारांमध्ये वीज प्रवाहित केली. जिवंत वीजतारांना स्पर्श झाल्याने बापलेकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यासंदर्भात दशरथ दुधराम हातझाडे (३५) रा. मोरगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अर्जुनी मोरगाव पोलिसांनी आरोपी ईश्वरदास मनोहर पर्वते (४७) याला अटक केली आहे. एखाद्या जीवाचा मृत्यू होण्याची शक्यता असल्याची जाणीव असतानाही शेतातील तारेच्या कुंपणाला जिवंत वीज प्रवाहित केल्याने हा गुन्हा घडला आहे.
आरोपीविरुद्ध कलम ३०४ भादंविचा गुन्हा नोंदविला आहे. पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किरण मेश्राम, पोलिस हवालदार रोशन गोंडाणे, महेंद्र पुण्यप्रेड्डीवार तपास करीत आहेत.