प्रखर दिव्यांमुळे अपघाताची शक्यता
गोंदिया : दुचाकी व चारचाकी वाहनांच्या प्रखर दिव्यांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. काही वाहनचालक साधे दिवे न लावता निळ्या रंगाचे तसेच प्रखर दिवे लावत असल्यामुळे समोरील वाहनाला त्याचा त्रास होतो. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी प्रखर दिवे लावणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करून अपघाताला आळा घालावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
गावागावातील हातपंप नादुरुस्त
गोंदिया : जिल्ह्यातील गावागावात असलेले बहुतांश हातपंप नादुरुस्त असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाईत आणखी भर पडत आहे. पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून अनेक ठिकाणी हातपंप बसविण्यात आले आहेत. मात्र, ते नादुरुस्त असल्याने अडचणी वाढल्या आहेत. आता उन्हाळा चांगलाच तापायला सुरुवात झाली असून पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. अशात हे हातपंप दुरुस्त करण्याची गरज असून तशी मागणी केली जात आहे.
शिपाई भरतीची वयोमर्यादा वाढवा
नवेगावबांध : मागील २-३ वर्षांपासून पोलीस शिपाई भरती प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरुण पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांचा विचार करता पोलीस भरतीसाठीची वयोमर्यादा ३३ वर्षांवरून ३५ वर्ष करण्यात यावी.
चिमुकले पक्षी संवर्धनाच्या कामात
चिरचाळबांध : शाळा बंद असल्याने घरातल्या घरात राहून कंटाळलेल्या चिमुकल्यांनी आता घरातीलच परसबागेत पक्षी संवर्धन करण्याचा चंग बांधला. उन्ह्याच्या दाहकतेपासून पक्ष्यांचे कंठ सुकून जाऊ नयेत, त्यांना सहजरीत्या पाणी मिळावे म्हणून आमगाव तालुक्याच्या भजीयापार येथील चिमुकले पक्षी संवर्धनाचे काम करीत आहेत.
कलावंतांना आर्थिक मदत देण्याची मागणी
गोंदिया : जिल्ह्यातील नाटक, तमाशा,गोंधळ, भारुड यासारख्या इतर कलेच्या कलावंतांना एक विशेष बाब म्हणून आर्थिक मदत करणारा लोक कल्याणकारी धोरणात्मक निर्णय घेऊन दिलासा घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. नाटक, तमाशा गोंधळ भारुड या कलेचे कलावंत प्रत्येक मंचावर विविध कलांचे सादरीकरण करून रसिक प्रेक्षक व श्रोत्यांचे मनोरंजनासह प्रबोधनाचे महान कार्य करीत आहेत. यातून जी मिळकत मिळते त्यावरच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात.
बंधारा असूनही उपयोग नाही
सडक अर्जुनी : तालुक्यातील ग्राम राका-सौंदड मार्गावरील चुलबंद नदीवर कोल्हापुरी बंधारा असून, त्याचा काहीच उपयोग घेतला जात नाही.
बैल बाजारांना उतरती कळा
गोंदिया : एकेकाळी प्रसिद्ध असलेले जिल्ह्यातील बैल बाजार सध्या आपले मोल हरवून बसल्याचे दिसत आहे. यांत्रिक शेतीमुळे बैलजोड्या विकणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
गोंडमोहाडी-अत्री रस्ता गेला खड्ड्यात
परसवाडा : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत गोंडमोहाडी-अत्री-दवनीवाडा रस्त्याचे काम ४ मार्च रोजी पूर्ण झाल्याचे महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेकडून सांगण्यात आले आहे.
राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये दलालांचा सुळसुळाट
गोंदिया : तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये दलालांचा सुळसुळाट निर्माण झाला आहे. बँकेतील कामे दलालांमार्फत केल्यास तत्काळ होत असल्याने सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे.
भर रस्त्यावर जनावरांचा ठिय्या
गोरेगाव : शहरातील रस्त्यावर मोकाट जनावरांचा ठिय्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प होत असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
विद्युत डीपी खुली असल्याने अपघातांचा धोका
बिरसी-फाटा : सहकारनगर, साईनगर येथे वीज वितरण करण्यात येणाऱ्या डीपीतील तारांवरील कोटिंग पूर्णपणे निघाल्याने तारा खुल्या पडल्या आहेत. त्यामुळे येथे नालीचे काम करणाऱ्या मजुरांच्या जीवाला फार मोठा धोका होऊ शकतो. कनिष्ठ अभियंता कार्यालय वाऱ्यावर सोडून जातात. याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी सारंग मानकर यांनी केली आहे. गोंदिया-तुमसर रस्त्यावरील नाल्याचे काम सुरू आहे. येथे असलेल्या डीपीतील तारा खुल्या पडल्या असून, त्यातून वीजप्रवाह सुरू आहे. अगदी त्याला लागूनच नालीच्या कामात लोखंडी सळाखी बांधण्याचे काम चालू आहे. अशात खुल्या तारांना सळाखींचा स्पर्श झाल्यास जीवितहानी होऊ शकते. याकडे त्वरित लक्ष देऊन संबंधित बाबीची गंभीरता अधिकारी व लोकप्रतिनिधींनी समजून घ्यावी, अशी मागणी मानकर यांनी केली आहे.