अर्जुनी मोरगाव तालुक्यात फिफ्टी-फिफ्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:31 AM2021-01-19T04:31:25+5:302021-01-19T04:31:25+5:30
अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी घोषित करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्डात मतमोजणी करण्यात आली. ...
अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी घोषित करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्डात मतमोजणी करण्यात आली. या निवडणुकीत राजकीय पक्षांचे चिन्ह नसले तरी गावाचे कारभारी कोण, यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली जात असल्याचे चित्र या निवडणुकीत बघावयास मिळाले. तालुक्यात भाजप विरूद्ध काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समर्थीत उमेदवार निवडणूक रिंगणात होते. भाजप व काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसला फिफ्टी-फिफ्टी यश आल्याचे चित्र आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यात २९ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी निवडणूक पार पडली. त्याची मतमोजणी सोमवारी झाली. कन्हाळगाव, मांडोखाल व देवलगाव ग्रामपंचायतीसाठी बिनविरोध निवडणूक झाली. भरनोली गट ग्रामपंचायतीमध्ये ११ गावे समाविष्ट आहेत. स्वतंत्र ग्रामपंचायत हवी या मागणीसाठी या गावातील ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार घालून नामनिर्देशन पत्र दाखलच केले नाही. त्यामुळे प्रत्यक्ष २५ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. इसापूर ग्रामपंचायतीमध्ये दोन गटांना प्रत्येकी ३ जागा मिळाल्या. तिसऱ्या गटाची एक महिला उमेदवार निवडून आल्याने ती कोणत्या गटात समाविष्ट होणार याविषयी तर्क-वितर्क लावले जात आहेत. बाराभाटी ग्रामपंचायतीच्या प्रभाग २ ची जागा अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव होती. यात सरस्वता केवळराम चाकाटे व उषा रवी नाईक या दोन महिला उमेदवार निवडणूक रिंगणात होत्या. दोघीनाही २३४ अशी समान मते मिळाली. त्यामुळे ईश्वरचिठ्ठीद्वारे विजयी उमेदवार घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला. रिहान्शु गुरुदेव शहारे या चार वर्षाच्या बालकाने ईश्वरचिठ्ठी काढली. यात सरस्वता चाकाटे या विजयी झाल्या. विशेष म्हणजे यात ९ मतदारांनी नापसंतीची (नोटा) मते दिली.
.....