अखेर मेडिकलमध्ये नवीन आरटीपीसीआर मशीन दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:32 AM2021-04-28T04:32:03+5:302021-04-28T04:32:03+5:30
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना चाचण्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढले होते. मात्र येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ...
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना चाचण्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढले होते. मात्र येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आरटीपीसीआर नमुने तपासणी एकच मशीन असल्याने ताण वाढला होता. त्यामुळे प्रलंबित नमुन्यांची संख्यादेखील वाढली होती. मात्र आता पुन्हा एक आरटीपीसीआर चाचणी मशीन मंगळवारी मेडिकलमध्ये दाखल झाल्याने स्रावनमुने तपासणी करण्याची क्षमता वाढणार आहे.
कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुन्हा आरटीपीसीआर मशीन लावण्यासंदर्भात खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पालकमंत्री नवाब मलिक यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर १६ एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी व आराेग्य विभागाला आठ दिवसांत नवीन आरटीपीसीआर मशीन खरेदी करण्याचे निर्देश दिले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने हाफकिन्स कंपनीकडून नवीन व्हीडीआरएल आरटीपीसीआर मशीन खरेदी केली आहे. हे नवीन मशीन मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले आहे. नवीन आरटीपीसीआर मशीनमुळे स्रावनमुने प्रलंबित राहण्याची समस्या मार्गी लागणार आहे. तसेच दररोज दीड ते दोन हजारांवर स्रावनमुने तपासणी करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे मागील आठ-दहा दिवसांपासूनची जिल्हावासीयांची ओरड कमी करण्यास मदत होणार आहे.