देवरी : ट्रक चालकाला अडवून तो ट्रक मजुरांसह पळवून नेणाऱ्या पाच आरोपींना मालकाच्या सतर्कतेवरून पोलिसांच्या मदतीने अवघ्या दोन तासाच्या आत पकडण्यात आले. या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली. शुभम सोनकर (२९), विशाल कुशवाह (२२), रोशन सिंग (२५), करण सिंग (२५), लुकेश सिंग (२४) सर्व रा. भिलाई, असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, १४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता मो. इरशाद मो. फारुख कुरेशी (२८) रा. शिवनी (मध्य प्रदेश) हे ट्रक एमएच ४० बी.जी. ६६१७ मध्ये दोन मजुरांना घेऊन नागपूर येथून बोरी जि. गडचिरोली येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरून जात असताना दुपारी ४ वाजता देवरीच्या मिलन ढाब्याजवळ सी.जी. ०७ बी.के. ५१८० हे वाहन ट्रकच्या जवळ येऊन त्यांचा ट्रक थांबविण्याचा इशारा केला. ट्रक थांबताच एक इसम हा ट्रकमध्ये चढून त्याने ट्रकची किल्ली काढून ट्रक चालकाला खाली उतरविले. त्यांना आपण कोण आहात असे विचारले असता आरोपींंनी आम्ही गाडी सीझ करणारे आहोत, असे सांगितले. परंतु गाडीचे फायनान्स इन्स्टॉलमेंट ५ सप्टेंबरला भरले असल्याने ट्रक चालकाला संशय आला. त्याने ट्रक मालकाचे मुलास फोन लावला. परंतु आरोपींनी त्याचा मोबाईल हिसकावून मारपीट केली. ट्रक चालकासोबत असलेल्या दोन साथीदारांनी ट्रकमध्ये असलेल्या दोन मजुरांकडे असलेले मोबाईल हिसकावून आपल्याजवळ ठेवले. त्यानंतर एका इसमाने ट्रक आपल्या ताब्यात घेऊन मजुरांसह छत्तीसगडच्या दिशेने निघाले. ट्रक चालकाला आरोपींनी त्यांच्याकडील असलेले झेस्टा गाडीत बसवून ट्रक सोबत निघाले. ट्रक मालकाने ट्रक चालकाला फोन लावले असता तो फोन उचलत नसल्याने नंतर चालक व दोन्ही मजुराचे फोन बंद झाले. त्यामुळे ट्रक चालकाला संशय आला. त्याने देवरी येथे राहणारा भाऊ नियाज कुरेशी यास सांगितले. त्यांनी ही बाब देवरी पोलिसांना कळविली. ठाणेदार सिंगनजुडे यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ पोलीस स्टफसह ट्रकचा शोध घेण्यासाठी छत्तीसगडकडे रवाना झाले. छत्तीसगडमधील चिचोला गावापुढे ट्रक पळून जाताना दिसला. तो ट्रक व ते झेस्टा वाहन पकडले. आरोपींवर कलम ३९५, ३६५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक नरेश उरकुडे करीत आहेत.