इसापूर : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथील पाच कुटुंब पडक्या घरात वास्तव्य करीत आहे. मात्र त्यांना अर्ज करूनसुद्धा घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे या कुटुंबांना जीव धोक्यात घालून वास्तव्य करावे लागत आहे. याची लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने दखल घेतलेली नाही. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड, जरुघाटा, चिचोली येथे सन २०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रतापगड येथील पाच जणांच्या घराची पूर्णतः पडझड झाली होती. अतिवृष्टीने घराची पडझड झाल्याने त्याच रात्री त्या कुटुंबांनी प्रतापगड येथील भक्ती निवासात आश्रय घेतला होता. त्याच दिवशी जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हा दक्षता समितीचे पदाधिकारी, तहसीलदार यांनी मोका पंचनामा करून या प्रतापगड येथील पाच कुटुंबांना आर्थिक मदत देऊन त्या कुटुंबाचे स्थलांतर करण्यासाठी निवड केली होती. पण चार वर्षं लोटूनही त्या त्यांना कुठलीही मदत अथवा घरकुल देण्यात आले नाही. प्रतापगड येथील महिला वर्षा इबा झिलपे मुकी असून, पती दिव्यांग आहे. त्यांना दोन मुले असून, मोलमजुरी करूनच त्यांचा उरदनिर्वाह चालतो. त्यांनादेखील जीर्ण घरात उदनिर्वाह करावा लागत आहे. जरुघाटा गाव प्रतापगड ग्रामपंचायत अंतर्गत येत असून, जरुघाटा येथे अतिवृष्टी व ढगफुटीने शंकर नकटू ऊईके यांचे कुटुंब मागील ३५ वर्षांपासून गवताचे झोपडीमध्ये वास्तव्य करीत आहेत. दहा वर्षांपासून घरकुलाची मागणी असून, ती अद्यापही पूर्ण झालेली नाही. शंकर ऊईके यांनी सांगितले की, सन २०१६च्या अतिवृष्टी व ढगफुटीने आम्हाला कोणत्याच प्रकारची मदत मिळाली नाही. जरुघाटा येथील चंद्रकला बकाराम बावने व बकाराम गोविंदा बावने हे वृद्ध असून, झोपडीत वास्तव्य करीत आहेत. मागील पावसाळ्यात रात्रभर चारही बाजूचे ओलाव्याने रात्र जागून काढली. पण या गरीब कुटुंबाना अजूनही घरकुल मिळालेले नाही. २०२२ पर्यंत गरीब कुटुंब घरकुलापासून वंचित राहू नये म्हणून घरकुल योजना राबवित आहे. मात्र आजही ही पाच कुटुंबे घरकुल योजनेपासून वंचित आहेत.
स्थानिक अधिकाऱ्यांकडून घरकुल योजनेचा बट्याबोळ केंद्र व राज्य शासनाकडून अनेक योजनांतर्गत गरीब कुटुंबांसाठी घरकुल योजना राबविण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०२२पर्यंत पक्के घर मिळावे, कोणीही घरापासून वंचित राहू नये म्हणून घरकुल योजना सुरू केली. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना, सबरी योजना अंतर्गत घरकुलाचा लाभ गरीब कुटुंबाना दिला जातो. पण स्थानिक अधिकाऱ्यांच्या दुलर्क्षित धोरणामुळे योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे. घर तिथे शौचालय ही योजना कागदावरचकेंद्र व राज्य शासनाने घर तिथे शौचालय ही योजनाही कागदावरच राबविली जात असल्याचे चित्र आहे. या योजनेचा लाभ सधन लोकांनाच देण्यात आला. ज्यांच्याकडे शौचालय आहेत त्यांनाच शौचालय मंजूर करण्यात आले. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात ३० टक्के गावातील लोकांकडे शौचालय नाहीत. जरुघाटावरून चार किमी अंतरावरील करांडली, बोंडगाव, सुरबंद येथील कुटुंब शौचालयापासून वंचित आहे.