सालेकसा : शासनाने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग गुरुवारपासून (दि.१५) सुरु करण्याचा निर्णय घेतला. मात्र यासाठी ग्रामपंचायतचा ठराव आणि पालकांचे संमतीपत्र अनिवार्य केले आहे. तालुक्यातील एकूण २७ शाळांपैकी पहिल्याच दिवशी प्रत्यक्षात केवळ ५ शाळा सुरु झाल्या. त्यामुळे पहिल्याच दिवशी शाळांमध्ये मोजकेच विद्यार्थी उपस्थित होते. तर तब्बल दीड वर्षानंतर शाळेचे प्रत्यक्षात दर्शन झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना शासनाने राज्यातील शाळा सुरु करण्यासाठी ग्रामपंचायत ठराव आणि पालकांचे संमतीपत्र अनिवार्य केले आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्यासाठी अडचणी येत आहे. गुरुवारी पहिल्याच दिवशी तालुक्यातील एकूण २७ पैकी जेमतेम पाच शाळा सुरु झाल्या. यात दोन माध्यमिक शाळा आणि तीन प्राथमिक शाळेतील आठव्या वर्गांचा समावेश आहे. ग्रामीण भागात ज्या गावामध्ये मागील एक महिन्यापासून एकही कोरोना रुग्ण नाही अशा गावात ग्रामपंचायतने दिलेल्या ठरावानुसार शाळा सुरु करता येईल असे आदेश शासनाने काढले आहे. ठराव दिल्यास १५ जुलैपासून शाळा सुरु करावी. ज्यात ८ वी ते १२ पर्यंत किंवा त्यापैकी कोणतेही वर्ग असतील अशी शाळा सुरु करावी असे आदेश दिले. शाळा सुरु करण्याचा चेंडू ग्रामपंचायतच्या कोर्टात टाकला. प्राथमिक शाळांमध्ये आठव्या वर्गात त्या गावचेच विद्यार्थी शिक्षण घेतात. परंतु ज्या ठिकाणी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा जेथे बारावीपर्यंत वर्ग असतात त्या शाळांमध्ये इतर गावाचे विद्यार्थी सुध्दा येतात. तेथे येणारे विद्यार्थी ५ ते १० किमी पेक्षा जास्त अंतरावरचे सुध्दा असतात. अशात त्या शाळांना तसा ठराव मिळणे कठीण असते. त्यामुळे शाळा सुरु करण्याचा पेच निर्माण झालेला आहे. तालुक्यातील बिंझली, बोदलबोडी आणि झालीया येथील प्राथमिक तर निंबा आणि मक्काटोला येथील माध्यमिक शाळा गुरुवारी पहिल्या दिवशी सुरु करण्यात आल्या. तर इतर शाळांना ग्रामपंचायतचा ठराव आणि पालकांच्या संमतीपत्राची प्रतीक्षा आहे.
..........
टप्प्या टप्प्याने सुरु होणार शाळा
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटाेक्यात आला असून पालक सुध्दा आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यासाठी अनुकूल होत आहेत. त्यामुळेच गुरुवारी जिल्ह्यातील १४२ ग्रामपंचायती व समित्यांनी शाळा सुरु करण्याचे ठराव पारित केले आहे. येत्या आठवडाभरात आणखी ठराव पारित होण्याची शक्यता असून टप्प्या टप्प्याने शाळा सुरु होणार आहेत. गुरुवारपासून काही शाळा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून येत होता.
.............
कोट
शासन निर्णय ७ जुलै मधील समित्यांद्वारा निर्णय घेऊनच शाळा सुरु कराव्यात. विना समिती विना ठराव शाळा सुरु करु नये असे निर्देश शाळांना दिले आहे.
- एस.जी.वाघमारे, गटशिक्षणाधिकारी पं.स.सालेकसा