पडलेली झाडे पोहोचविली घरी : कारवाईची ग्रामपंचायत सदस्याची मागणींआमगाव : फुक्कीमेटा मार्गावरील सुरिक्षत जंगलात वादळीवाऱ्यामुळे पडलेली झाडे वनरक्षकांनी वन विभागाकडे जमा न करता थेट आपल्यी घरी पोचविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यातून वनरक्षकच भक्षक बनल्याचे दिसून येत असून याला वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याचे बोलले जात आहे. प्रकरणी दोघांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य लेकेश्वर सोनवाने यांनी केली आहे. जामखारीवरुन फुक्कीमेटा गावाकडे जाणाऱ्या मार्गावर वन विभागाचे सुरक्षित जंगल आहे. सदर वनविभागाच्या सुरक्षित वन कुंपणात २ जून रोजी मोठ्या प्रमाणात मोहाची झाडे वादळाने कोसळली. सुमारे १०-१५ झाडे पडल्यानंतर जवळपासच्या काही नागरिकांनी आपल्या घरी नेले. त्याच संधीचा फायदा घेत वनरक्षक बनोटे यांनी सेमोदेमो पहाडीजवळ असलेल्या आपल्या घरी ट्रॅक्टरद्वारे मोहाची झाडे नेली. आंबेडकर चौकात असलेल्या वनतपासणी नाक्यावर त्यावेळी वनरक्षक माहुले कार्यरत होते. त्यांनीही ट्रॅक्टरची तपासणी केली नाही.जवळपास आठ ते दहा फूट लांब व इतर भाग वनरक्षकाच्या घरी नेण्यात आला. कामावर असलेल्या मजुरांनी ट्रॅक्टरमध्ये ठेवण्याचे काम केले. हा संपूर्ण चोरीचा प्रकार असून वनपरिक्षेत्राधिकारी पवार यांच्या उपस्थितीत झाला. सामान्य व्यक्तीने जर लाकूड नेले तर त्यांच्यावर कारवाई व वसुली केली जाते. मग या वनरक्षकावर कारवाई का करण्यात आली नाही अशी ओरड होत आहे. वनांच्या व वन मालमत्तेच्या संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी असणारे रक्षकच आता त्यांचे भक्षक बनल्याचेही या प्रकारातून दिसून येत आहे. करिता वनरक्षक व परिक्षेत्राधिकारी या दोघांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी जामखारी ग्रामपंचायत सदस्य सोनवाने यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
वनरक्षक च बनले भक्षक
By admin | Published: June 05, 2016 1:30 AM